'बिग बॉस' फेम अभिनेत्री कशिश कपूरच्या घरी चोरी झाली आहे. ४ लाख रुपये घेऊन नोकर फरार झाल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. याप्रकरणी मुंबईतील अंबोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पोलीस अधिक तपास करत आहे. कशिशच्या अंधेरी येथील घरात ही चोरी झाली आहे.
कशिश कपूर ही मुळची बिहारची आहे. सध्या ती अंधेरीमधील आझाद नगर येथील वीरा देसाई रोड येथे असलेल्या न्यू आंबिवली सोसायटीमध्ये राहते. कशिशच्या याच घरात काम करणाऱ्या नोकराने ४ लाख रुपये लंपास केले. चोरी करून नोकर फरार झाला आहे. आरोपीचं नाव सचिन कुमार असं असून गेल्या ५ महिन्यांपासून तो कशिशच्या घरी काम करत होता. रोज सकाळी तो ११.३० वाजता कामावर यायचा आणि १ वाजता काम संपल्यावर निघून जायचा.
कशिशने तिच्या आईला पैसे पाठवण्यासाठी घरात ९ लाख रुपये ठेवले होते. मात्र, ९ जुलैला जेव्हा कशिशने कपाट उघडलं तेव्हा तिला फक्त २.५ लाख रुपयेच असल्याचं समजलं. तिने संपूर्ण कपाट शोधलं मात्र पैसे मिळाले नाहीत. ४.५ लाख रुपये गायब झाल्याचं समजताच कशिशने सचिनला विचारणा केली. तेव्हा तो घाबरला आणि फरार झाला. त्यामुळे कशिशचा संशय आणखीन बळावला. आणि तिने सचिनच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पोलीस सचिनचा शोध घेत आहेत. दरम्यान, कशिशने काही टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बिग बॉस' या लोकप्रिय रिएलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती.