Bigg Boss 19: छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस'. आता पुन्हा एकदा 'बिग बॉस हिंदी' घरातील कल्ला तुम्हाला पाहता येणार आहे. 'बिग बॉस हिंदी'चे आतापर्यंत १८ पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आहेत. आता 'बिग बॉस'चे १९ वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या २४ ऑगस्ट रोजी कलर्स टीव्हीवर 'बिग बॉस १९' सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यातील काही स्पर्धकांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. त्यापैकी एका नावाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
कपिल शर्मा शोमुळे घराघरात ओळख मिळवलेला अभिनेता अली असगर यांना ‘बिग बॉस’ मध्ये सहभागी होण्यासाठी निर्मात्यांनी मोठी रक्कम ऑफर केल्याची चर्चा आहे. 'बिग बॉस लेटेस्ट न्यूज' या इन्स्टाग्राम पेजनुसार, त्याला शोसाठी आमंत्रण पाठवले गेले आहे. मात्र, त्यांनी अजूनही ते स्वीकारल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. अली असगर शोमध्ये दाखल झाल्यास 'बिग बॉस'च्या घरात हास्याचा तडका नक्कीच पाहायला मिळणार आहे.
अलिकडेच 'बिग बॉस हिंदी'चा होस्ट सलमान खान याने टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या सीझनमध्ये पहिल्यांदाच लोगोमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच हा शो टीव्हीवर येण्यापूर्वी जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. अली असगसोबतच इतरही काही जणांची नावं 'बिग बॉस १९'साठी चर्चेत आहेत. त्यामध्ये शैलेश लोढा, गुरुचरण सिंह, मुनमुन दत्ता, लता सबरवाल, फैजल शेख, जन्नत जुबैर, पुरव झा आणि अपूर्वा मखिजा यांचा समावेश आहे.