Bigg Boss 19: 'बिग बॉस' या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या आणि वादग्रस्त शोचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बिग बॉस १९'बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यंदाच्या पर्वात कोणते नवे चेहरे दिसणार याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 'बिग बॉस १९'मध्ये दिसणाऱ्या स्पर्धकांमध्ये मराठमोळे अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या नावाचीही चर्चा होती. याबाबत आता उपेंद्र लिमये यांनी स्वत:च खुलासा केला आहे.
'बिग बॉस १९'मध्ये सहभागी होण्याबाबत उपेंद्र लिमये यांनी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "बिग बॉसच्या नव्या पर्वात सहभागी होण्याबाबत मला अनेकांकडून विचारणा झाली. पण, मी सांगू इच्छितो की मी या शोचा भाग नाही. तुमचा समजूतदारपणा आणि सपोर्ट यासाठी धन्यवाद", असं उपेंद्र लिमये यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे उपेंद्र लिमये 'बिग बॉस १९'मध्ये दिसणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, सलमान खान होस्ट करत असलेला 'बिग बॉस १९' हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २४ ऑगस्टपासून 'बिग बॉस १९' प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नव्या पर्वात अनेक बदलही दिसणार असल्याचं बोललं जात आहे.