नुकतंच Bigg Boss 19 चा ग्रँड प्रीमियर २४ ऑगस्ट रोजी दणक्यात पार पडला. 'बिग बॉस हिंदी'च्या घरात यंदा एका मराठमोळ्या चेहऱ्याची एन्ट्री झाली आहे. यंदाच्या पर्वात 'महाराष्ट्रीयन भाऊ' म्हणून लोकप्रिय असलेला मराठी कॉमेडियन प्रणित मोरे देखील सहभागी झाला आहे. त्याच्या एन्ट्रीने मराठी चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रणित मोरे 'बिग बॉस'मध्ये जाताच त्याला मराठी इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणींकडून पाठिंबा मिळत आहे. यातच 'बिग बॉस मराठी' गाजवलेल्या एका लोकप्रिय स्पर्धकानं प्रणितला खास पोस्ट शेअर करत पाठिंबा दिला आहे.
प्रणितला पाठिंबा देणारी ती आहे अंकिता वालावलकर. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात टॉप ५ मध्ये पोहोचलेली अंकिता वालावलकर ही प्रणितच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. अंकिताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर प्रणितचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने रेड हार्ट इमोजीचा वापर करत एक खास कॅप्शनमध्ये लिहलं, "तु नड, आम्ही आहोत". अंकिताने दिलेला हा पाठिंबा आणि तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून मराठी कलाकार एकमेकांना कसे पाठिंबा देतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.
प्रणित हा सोशल मीडिया, युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर विशेष लोकप्रिय आहे. त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या शोंनादेखील विशेष गर्दी होते. प्रणित हिंदी आणि मराठीमध्ये स्टँडअप कॉमेडी करतो. त्याने यापूर्वी रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले होते. तसेच तो एका वादातही अडकला होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू अभिनेता वीर पहाडियावर केलेल्या विनोदामुळे त्याच्यावर हल्ला झाला होता. प्रणितने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. आता प्रणित 'बिग बॉस'मध्ये नक्कीच दमदार खेळ करेल अशी अपेक्षा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत. ता हिंदी प्रेक्षकांमध्ये तो किती लोकप्रिय होतो आणि 'बिग बॉस १९' च्या घरात तो किती काळ टिकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.