मराठी टेलिव्हिजनची शेवंता म्हणून अपूर्वा नेमळेकरने ओळख मिळवली. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या अपूर्वाला रात्रीस खेळ चाले मधील शेवंताने प्रसिद्धीझोतात आणलं. सध्या अपूर्वा प्रेमाची गोष्ट मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अपूर्वा करिअरसोबतच तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत होती. करिअरच्या शिखरावर असताना अपूर्वाचं लग्न झालं होतं. मात्र काही कारणांमुळे तिचा घटस्फोट झाला. मात्र, आता अपूर्वाने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अपूर्वाने आम्ही असं ऐकलंय या पॉडकास्टमध्ये सिंगल असल्याचं सांगितलं. ती म्हणाली, "माझं लग्न झालं होतं. आता घटस्फोट होऊनही १० वर्ष झाली आहेत. त्यातून मी आता बाहेर पडली आहे. काही गोष्टी स्वीकारायला वेळ लागला. पण या सगळ्यातून आता वाटतं मला नेमकं काय हवंय आणि काय नकोय याची क्लॅरिटी आलेली आहे. मला लगेच कुठलाही निर्णय घ्यायचा नव्हता. त्यामुळे मी बराच वेळ घेतला आणि आता मी तयार आहे. पण, मी सिंगल आहे हे अनेकांना पटत नाही. कारण, सगळ्यांना असंच वाटतं की उगाचंच काहीतरी सांगतेय. कळलंच नाही की इतके वर्ष गेले कधी...काही वर्ष दु:खात गेली, काही वर्ष स्वत:ला ओळखण्यात गेली. मग काही वर्षांनी सिंगल असल्याची मजा यायला लागली".
पुढे ती म्हणाली, "माझा लग्नसंस्थेवर भयंकर विश्वास आहे. अनुभव घेण्यासाठी ही एक सुंदर गोष्ट आहे. पण, मला वाटतं की लग्न करायचं की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मुळात ते एक पॅकेजसारखं असतं. प्रेम, लॉयल्टी, हॉनेस्टी हे सगळं तुम्हाला मिळणार आहे का? आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं तुम्ही देऊ शकता का? ज्या दिवशी तुम्हाला याची जाणीव होईल की तुम्ही हे द्यायला आणि घ्यायला तयार आहात. तेव्हाच मला वाटतं एखाद्याने लग्न करावं. नाहीतर उगाचच सोसायटीचं प्रेशर आहे. आपल्या वयातले सगळेच लग्न करत्यात आणि दर वेळेला आपणच लग्न जाऊन अटेंड करतोय. तर आपलं लग्नही कोणीतरी अटेंड करावं म्हणून कोणी लग्न करू नये. आपल्याला नेमकं काय हवंय आणि आपण हे देऊ शकतोय का? आपण एखाद्या व्यक्तीची साथ देऊ शकतोय का? हे जेव्हा कळेल तरच एखाद्याने उडी घ्यावी. कारण, त्यांच्याबरोबर बरेच लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. मी हे अनुभवलं आहे. पण, आता मला लग्न पुन्हा अनुभवायचं आहे".