Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अजूनही बरसात आहे' मालिकेत आदिराजला विसरून मीरा आयुष्याची सुरुवात नव्याने करेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 19:30 IST

'अजूनही बरसात आहे' मालिकेत काही फ्लॅशबॅक सीन बघायला मिळताहेत ज्यातून मीरा आणि आदिराज यांची भूतकाळातली प्रेमकहाणी उलगडतेय. या फ्लॅशबॅक सिन्सना प्रेक्षकांची खास पसंती मिळतेय आणि हे सीन चित्रित करण्यासाठी कलाकार आणि संपूर्ण टीम अतिशय मेहेनत घेते आहे.

प्रेमाला कुठे असते Expiry Date? असं म्हणत बऱ्याच वर्षांनी उमेश कामात आणि मुक्ता बर्वे हे कलाकार  'अजूनही बरसात आहे' या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आले.मालिकेवर आणि या जोडीवर चाहत्यांच्या प्रेमाचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. ही मालिका १२ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  मीरा आणि आदिराज यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांची पसंती मिळवत आहे.  प्रेक्षकांच्या या आवडत्या जोडीसाठी तुफान प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेचा पहिला लुक प्रेक्षकांसमोर आला  आणि प्रेक्षकांच्या मनात मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली होती. मालिकेच्या आजपर्यंतच्या सगळ्या प्रोमोंना, पोस्टर्सना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

चाहत्यांनी कविता पाठवून, रांगोळ्या काढून, मालिकेच्या शीर्षकगीताची कॅलिग्राफी केलेली छत्री तयार करून आपलं प्रेम कलाकारांपर्यंत पोचवलं आहे. एवढंच नाही तर  #Adira असा हॅशटॅगसुद्धा या जोडीसाठी चाहत्यांनी बनवला आहे.मीरा आणि आदिराज यांची भेट होईल की नाही, अशी परिस्थिती असताना १० वर्षांनी आदिराज आणि मीरा पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत, आता पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडणार, हे पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहे.

मालिकेत काही फ्लॅशबॅक सीन बघायला मिळताहेत ज्यातून मीरा आणि आदिराज यांची भूतकाळातली प्रेमकहाणी उलगडतेय. या फ्लॅशबॅक सिन्सना प्रेक्षकांची खास पसंती मिळतेय आणि हे सीन चित्रित करण्यासाठी कलाकार आणि संपूर्ण टीम अतिशय मेहेनत घेते आहे. या सिन्ससाठी कलाकार आत्ताच्या वयापेक्षा १० वर्षं तरुण दाखवण्यात आले आहेत. त्यासाठी मुक्ताची वेगळी हेअर स्टाईल आणि उमेशचा बिना दाढीचा लूक दाखवण्यात आला आहे. फ्लॅशबॅकसाठी पूर्ण दाढी केल्यानंतर पुन्हा वर्तमानातलं चित्रीकरण करण्यासाठी उमेशला मध्ये २-३ दिवस वेळ द्यावा लागतोय. सध्या चित्रीकरणासाठी अनेक प्रकारचे नियम पाळावे लागताहेत अशा परिस्थितीत दोन लुक्स सांभाळून चित्रीकरण करणं, ही कलाकारांसाठी आणि टीमसाठी तारेवरची कसरत आहे आणि मालिकेला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम हे या केलेल्या कसरतीचं फळ आहे, हे नक्की. 

भूतकाळात घडलेल्या घटनांचा परिणाम वर्तमानावर होईल का? हे सगळं पुढे उलगडत जाणार आहे.आदिराज आणि मीरा अजूनही अविवाहित आहेत आणि मीराच्या आयुष्यात तिचा एक मित्रही आहे. आता आदिराजला विसरून मीरा आयुष्याची सुरुवात नव्याने करेल का? आदिराज आणि मीरा यांचं नातं कोणतं वळण घेईल? हे आगामी भागात पाहणे रंजक असणार आहे. 

टॅग्स :मुक्ता बर्वेउमेश कामत