Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:01 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकर्षणच्या राजकीय कवितेवर मिश्किल टिप्पणी करत त्याची फिरकी घेतली. ज्यामुळे उपस्थित असलेले प्रेक्षक खळखळून हसले.

राजकारण आणि राजकारणी म्हटलं की अनेकदा गंभीर आणि तणावपूर्ण वातावरण डोळ्यासमोर येतं. पण जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार एखाद्या कार्यक्रमात येतात, तेव्हा त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि मिश्किल स्वभाव वातावरण हलकं-फुलकं करून टाकतो. याची प्रचिती पुन्हा एकदा आली. नुकतंच पुण्यात अखिल भारतीय नाट्य परिषदेचा वर्धापनदिन सोहळा अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा आचार्य अत्रे यांच्या नावाने पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. मात्र, यावेळी अजित पवारांनी संकर्षणच्या एका कवितेवरून तुफान फटकेबाजी केली. ज्यामुळे उपस्थित असलेले प्रेक्षक खळखळून हसले. 

कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, "संकर्षणने मराठवाड्याचा उल्लेख केला, सासुरवाडीचा उल्लेख केला. बराच काही बोलून गेला. जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे त्यांचं टिपिकल वाक्य आहे. परभणीत काही असो किंवा नसो, एवढं वाक्य मात्र त्यांना चांगलं जमतं. मी खोटं सांगत नाहीये, मी तिथे खूप वेळा काम केलंय. त्यालाही तिथली परिस्थिती माहितेय".

पुढे ते म्हणाले, "निवडणुकीच्यावेळी त्यानं लिहलेली कविता प्रचंड गाजली. तेव्हा त्यानं 'पवार तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले' असं म्हटलं होतं. तेवढ्यात संकर्षणनं "सर, हे मी बोललो नव्हतो", असं स्पष्टीकरण दिलं. त्यावर अजित पवारांनीही आपल्या खास शैलीत उत्तर दिले, "तू मगाशी मी न सांगितलेलं बोलला ना? माझ्या कामाची एक पद्धत असते. मी कुणाच्या वाट्याला जात नाही, पण कुणी माझ्या वाट्याला गेलं, तर मी त्याला सोडत नाही. ही गोष्ट उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु, आता ती कविता मी तुझ्या नावावर खपवतो".

पुढे संकर्षणाला उद्देशून ते म्हणाले, "बाबा रे, मी स्वत: गाईचं शेण काढलंय, धारा काढल्या आहेत. आजही मी शेतात राबतो. आता गणेशोत्सवात मी बारामतीला जाणार आहे. तेव्हाही दुपारी तासभर वेळ काढून मी माझ्या शेतात जाणार आहे.  अचानक राजकारणात आलो. मला सगळे म्हणायचे की, तू इतका स्पष्ट बोलणारा आहेस, तू राजकारणात टिकणार नाहीस, तुझं न चालणार नाणं आहे. पण त्यांना काय माहीत होतं की, जनतेला हेच आवडतं आणि त्याच्यामुळे नाणं पुढे जाईल. तुझ्या मराठवाड्यातील बहिण मी पत्नी म्हणून केली. ती आणि मी दोघे मिळून अंडी गोळा करायचो".

यावेळी अजित पवारांनी संकर्षणचं कौतुकही केलं. गमतीचा भाग सोडा... पण, मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागातून पुढे येणं आणि त्यातून आपला वेगळा ठसा उमटवणं ही येड्या गबाळ्याचं काम नाही. यासाठी मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत तू घेतली आहे, याबद्दल कुणाचं दुमत नाही. त्याबद्दल तुझं कौतुक आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो", असं त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :अजित पवारसंकर्षण कऱ्हाडेपुणे