स्टार प्रवाहवर लवकरच 'नशिबवान' (Nashibvan Serial) ही नवीन मालिका दाखल होत आहे. ही गोष्ट आहे गिरीजा नावाच्या मुलीची जिच्या आयुष्यात अनेक आव्हानं आहेत. आई-वडिलांचं प्रेम नाही, लहान वयातच आलेली घरची जबाबदारी आणि जगण्यासाठीचा संघर्ष असं खडतर आयुष्य गिरीजाच्या नशिबी आलंय. मात्र या कठीण प्रवासात ती नशिबवान आहे याचा उलगडा तिला होतो. गिरीजा नशिबवान का आणि कशी ठरते याची गुंफलेली सुंदर गोष्ट म्हणजे नशिबवान मालिका. या मालिकेत प्रसिद्ध अभिनेता अजय पूरकर (Ajay Purkar) खलनायक म्हणजेच नागेश्वर घोरपडेच्या भूमिकेत दिसणार आहेत.
नागेश्वर आपल्या पैश्याच्या जोरावर सामान्य माणसांना त्रास देतो. खून करायलाही मागेपुढे बघत नाही. देवीची पूजा करतो. पण राक्षसारखा लोकांचा छळ करतो. इतका क्रुर वागूनही तो कधीच कोणत्या केस मध्ये अडकत नाही. हे खुनशी पात्र साकारणं किती आव्हानात्मक आहे हे सांगताना अजय पुरकर म्हणाले, जवळपास ६ वर्षांनंतर मालिकेत काम करतोय. मला नागेश्वर हे पात्र ऐकताक्षणीच खूप आवडलं. एकतर स्टार प्रवाहसारखी नंबर वन वाहिनी आणि कोठारे व्हिजन्स सारखी निर्मिती संस्था असताना नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. महेश कोठारेंसोबत काम करण्याचं माझं स्वप्न या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होतंय. नागेश्वर या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. या पात्राच्या अनुषंगाने मालिकेची गोष्ट घडणार आहे. याआधी मी इतका प्रभावशाली खलनायक साकारलेला नाही. त्यामुळे नागेश्वर साकारताना अभिनेता म्हणून माझा कस लागणार आहे.
स्टार प्रवाहवरच्या नशिबवान या नव्या मालिकेत अजय पूरकर यांच्यासोबत प्राजक्ता केळकर, नेहा नाईक या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रोमो पाहून मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.