मनोरंजन विश्वात अनेक जोड्यांचे सुखी संसार होतात. परंतु काही कलाकारांना मात्र घटस्फोटाच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. याशिवाय पार्टनरकडून छळ सहन करावा लागतो. अशीच काहीशी गोष्ट घडली अभिनेत्री शिवानी गोसेनसोबत. शिवानीने 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर की' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून नाव मिळवलं. तिने अलीकडेच वैयक्तिक आयुष्यातील दुःखद अनुभव शेअर केला आहे. एका मुलाखतीत शिवानीने दोन लग्न करुनही तिला यात कसा त्रास सहन करावा लागला, याचा खुलासा केलाय.
फेसबुकवरुन ओळख झाली अन्...
शिवानीने IANS सोबत बोलताना सांगितलं की, तिने आयुष्यात चुकीचे निर्णय घेतले आणि त्यामुळे तिला मानसिक, भावनिक, शारीरिक आणि सामाजिक पातळीवर खूप त्रास सहन करावा लागला. तिचा पहिला विवाह केवळ १७ व्या वर्षी झाला होता. मात्र, तो फार काळ टिकला नाही. त्यानंतर २०११ मध्ये फेसबुकवर राजीव गांधी नावाच्या व्यक्तीशी तिची ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर विवाहात झालं, पण हा संसार अवघ्या दोन महिन्यांतच तुटला.
शिवानीच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा लग्नानंतर खूपच बदलला. त्याने तिच्यावर संशय घेत सतत तिचा फोन चेक केला. शिवाय, तिची कार आणि दागिने गहाण ठेवले. इतकंच नव्हे तर, तो वॉचमनलाही पैसे देऊन तिच्यावर नजर ठेवायला सांगायचा. हे सर्व इतकं त्रासदायक होतं की, शिवानीला घराबाहेर पडणंही अशक्य वाटू लागलं. तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं.
या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिने दुसऱ्या महिन्यातच घटस्फोटासाठी अर्ज केला. सध्या या घटस्फोटाची न्यायप्रक्रिया सुरू आहे. शिवानी म्हणते की, विवाहसंस्था चुकीची नाही, पण चुकीच्या व्यक्तीशी केलेलं नातं तुमच्या आयुष्यात दुःख देऊ शकतं. अशाप्रकारे शिवानीने लग्नाबद्दल खुलासा केला. शिवानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तिने विविध मालिकांमध्ये काम केलं असून ती चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.