समृद्धी केळकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. सध्या समृती 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत समृद्धीने एका शेतकऱ्याच्या लेकीची कृष्णाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत समृद्धीने अनेक स्टंट सीन हे स्वत: शूट केले आहेत. मालिकेतील समृद्धीचा विहिरीत उडी घेतानाचा सीन व्हायरल झाला होता. आता आणखी एका सीनची चर्चा रंगली आहे.
'हळद रुसली कुंकू हसलं' मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेत शेतात लागलेल्या आगीत कृष्णाची गाय अडकते. तिला वाचवण्यासाठी कृष्णा आगीत उडी घेतल्याचं दाखवण्यात येणार आहे. हा सीन शूट करताना खरीखुरी आग सेटवर लावली गेली होती. त्या खऱ्या आगीत उडी घेत समृद्धीने हा सीन शूट केला. याबाबत अभिनेत्रीने पोस्ट लिहिली आहे. सीन कसा शूट झाला याची झलकही समृद्धीने व्हिडीओतून दाखवली आहे.
असा शूट झाला सीन...
नुकताच मालिकेत शेताला आग लागते आणि माझी (स्वाती ) गाय आगीत अडकते असा सीन होता. हे पडद्यामागचे काही क्षण आणि अख्ख्या टीमची मेहनत तुमच्या सोबत share करतेय. काही प्रमाणात आगी बरोबर शूट केला. बाकीअर्थात आग नंतर ग्राफिक्सने वाढवली जी तुम्हाला मालिकेत बघायला मिळेल…
शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा उगाच नाही म्हणत ओ…पावसाच्या आशेवर, वाऱ्याच्या लाटांवर, आणि मातीच्या सुगंधावर आयुष्य घडवणारा माणूस.तो संकटांना न घाबरता उभा राहतो. दुष्काळ असो की अतिवृष्टी, महागाई असो की नुकसान… त्याच्या चेहऱ्यावर कधीच तक्रार नसते. फक्त काम, कष्ट आणि एक आशेचा किरण!
मी फक्त मालिकेत त्याचं आयुष्य दाखवते…पण तो रोज ते जगतो.तोंडावर माती, कपड्यांवर घामाचे डाग, आणि मनात मात्र समाधान..कारण त्याच्या हातातल्या बीजांमध्ये आपलं उद्याचं पोट दडलंय…आपलं शेत जळालं ही कल्पना पण सहन होत नव्हती. हे दुःख कोणत्याही बळीराजावर यायला नको…हीच प्रार्थना…🙏
शेतकऱ्याच्या कष्टांना तोल नाही, तुलना नाही…त्याला मनापासून वंदन आणि सलाम!
समृद्धीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेतील तिची गावरान भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आधीच्या भूमिकांप्रमाणेच तिच्या या भूमिकेलाही प्रसिद्धी मिळत आहे.