मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे संभावना सेठ. भोजपुरी अभिनेत्री आणि 'बिग बॉस'मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री संभावना सेठने (sambhavna seth) अलीकडेच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका दुःखद प्रसंगाबद्दल उघडपणे बोलले आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, आयव्हीएफ (IVF) प्रक्रियेद्वारे गर्भधारणेच्या प्रयत्नात असताना तीन महिन्यांमध्ये तिला गर्भपाताच्या दुःखद घटनेला सामोरं जावं लागलं. यासाठी संभावनाने डॉक्टरांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे.
तिसऱ्या महिन्यात गर्भपात झाला अन्...
संभावना आणि तिचे पती अविनाश मिश्रा २०२४ पासून आई-बाबा होण्याच्या प्रयत्नात होते. संभावना प्रेग्नंट झाल्यावर तिने बेबी बंप पाहून फोटोशूटही केले होते आणि तिसऱ्या महिन्यात ती सर्वांसमोर प्रेग्नंसीची घोषणा करणार होती. मात्र स्कॅनदरम्यान तिला कळले की, १५ दिवसांपूर्वीच तिचा गर्भपात झाला आहे. "मी १५ दिवस माझ्या पोटात मृत अर्भक घेऊन फिरत होते, जे माझ्यासाठी अत्यंत धोकादायक होते."
डॉक्टरांचा निष्काळजीपणा भोवला
संभावनाच्या मते, डॉक्टरांनी आवश्यक असलेली जेनेटिक टेस्टिंग केली नाही. त्यामुळे जेनेटिकली अबनॉर्मल बाळ गर्भात राहिलं आणि नंतर गर्भपात झाला. "जर हे पाचव्या महिन्यात समजले असते, तर काय झाले असते?. मी सतत डॉक्टरांना माझ्या वेदनांविषयी सांगत होते. पण डॉक्टर म्हणत होते की, माझ्या शरीरात असलेल्या काही गाठींमुळे मला वेदना होत आहेत."
संभावना पुढे म्हणाली की, "गर्भपाताची दुःखद घटना जेव्हा डॉक्टरांसमोर आली तेव्हा त्यांनी, 'दुर्दैवी आहे, पुढच्या वेळी प्रयत्न करूया', असं असंवेदनशील उत्तर दिलं." अशाप्रकारे संभावनाने गर्भपाताची दुःखद कहाणी सर्वांसमोर उलगडली. संभावना तिच्या यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. संभावनाचे असंख्य चाहते तिला फॉलो करतात.