'आई कुठे काय करते' ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ठरलेली मालिका. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. या मालिकेत यशची भूमिका साकारून अभिनेता अभिषेक देशमुख घराघरात पोहोचला. आता अभिषेकच्या पत्नीची स्टार प्रवाहच्या मालिकेत वर्णी लागली आहे. अभिषेकची पत्नी कृतिका देवदेखील अभिनेत्री आहे. कृतिका स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत दिसणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे.
लपंडाव ही नवी मालिका स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेत कृतिका मुख्य भूमिका साकारणार आहे. सखी हे पात्र ती साकारताना दिसणार आहे. या मालिकेत रुपाली भोसलेही दिसणार आहे. रुपाली या मालिकेत सखीच्या आईची भूमिका साकारणार आहे. हे खलनायिकेचं पात्र असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. या मालिकेत अभिनेता चेतन वडनेरेदेखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
कृतिकाने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. बकेट लिस्ट, अनया, राजवाडे अँड सन्स या सिनेमांमध्ये ती दिसली होती. तर ताली या वेब सीरिजमध्ये तिने सुष्मिता सेनसोबत स्क्रीन शेअर केली होती. आता कृतिका मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.