Join us
Daily Top 2Weekly Top 5

हेच बघायचं बाकी होतं...!; 'विधवा पुनर्विवाह' FB पेजचा 'प्रताप' पाहून जुई गडकरी खवळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 17:23 IST

जाणून घ्या काय आहे प्रकरण

ठळक मुद्देतूर्तास या संतापजनक प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी जुईला पाठींबा देत, या प्रकाराबद्दल आक्षेप नोंदवला आहे.

सोशल मीडियावर कोणाच्या नावाने अफवा उडेल आणि कोणाच्या नावाने काय खपवले जाईल, याचा नेम नाही. आता मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी हिचेच बघा ना. होय, ‘विधवा पुनर्विवाह’ नावाच्या एका फेसबुक पेजने चक्क जुईला ‘विधवा’ ठरवून तिच्या नावाने आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित केला. जुईला ही जाहिरात दिसली तेव्हा तिला धक्काच बसला. तिने तातडीने सायबर सेलमध्ये याबद्दलची तक्रार नोंदवली.

जुईने स्वत: याबद्दल माहिती देत, या प्रकाराबद्दल संतापही व्यक्त केला. ‘विधवा पुनर्विवाह’ नावाच्या संबंधित फेसबुक पेजवर जुईचा फोटो वापरून एक मजकूर लिहिण्यात  आला आहे. ‘पुणे, महाराष्ट्र से हुं. पती की मृत्यू हो चुकी है. एक बेटा है ३ साल का.पैसा बहुत है मेरे पास, पुणे में अपना घर है. गरीब भी चलेगा बस नियत साफ होनी चाहिए’ अशा आशयाचा हा मजकूर आहे.  

एका चाहत्याने या जाहिरातीबद्दल जुईला या आक्षेपार्ह जाहिरातीबद्दल माहिती दिल्यावर तिच्या हा प्रकार लक्षात आला. तिने सोशल मीडियावर याबद्दल तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. ‘हेच बघायचं बाकी होतं...,’ असे लिहित तिने याबद्दल नाराजी व्यक्त केली. यानंतर तिने या प्रकाराबद्दल पोलिसांत तक्रारही दाखल केली. ‘आज मी या जागी आहे. उद्या अन्य कोणीही असू शकेल, मुलगा किंवा मुलगी. एखाद्याच्या परवानगीशिवाय त्याचा असा फोटो कोणीही वापरू शकत नाही. गुन्हा हा गुन्हाच आहे. असे घाणेरडे प्रकार कदापि सहन केले जाऊ शकत नाहीत,’ असेही तिने अन्य एका पोस्टमध्ये लिहिले.तूर्तास या संतापजनक प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी जुईला पाठींबा देत, या प्रकाराबद्दल आक्षेप नोंदवला आहे.

टॅग्स :जुई गडकरी