Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे मालिकाविश्वात कमबॅक, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 17:33 IST

मकरंद अनासपुरे यांना पुन्हा मालिकेत पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी वेगळी पर्वणी ठरणार आहे.

  सोनी मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. आता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे.  या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांनी पाहिली आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे', असं या मालिकेचं नाव आहे आणि ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी लवकरच दाखल होणार आहे. वेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेत प्रमुख भूमिकेत मकरंद अनासपुरे पाहायला मिळणार आहेत.

दिनकर त्र्यंबक गुळस्कर असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून पोस्ट ऑफिसच्या पार्सल विभागात गेले १७ वर्षं ते कार्यरत आहेत. हे पोस्ट ऑफीस  पारगावमधले आहे. मकरंद अनासपुरे यांना पुन्हा मालिकेत पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी वेगळी पर्वणी ठरणार आहे. आजवरच्या सिनेमांमध्ये आपण पाहत आलेला त्यांचा विशेष अंदाज आपल्याला  'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेतून पाहायला मिळेल. हलकी फुलकी कॉमेडी चे निरनिराळे विषय घेऊन 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या जोडीनी आजपर्यंत प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. वेगवेगळ्या प्रकारे आजवर त्यांना प्रेक्षकांना हसायला भाग पडला आहे. आता 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' मालिकेद्वारे ते हास्याचा धमाका घेऊन येत आहेत. ते पहिल्यांदाच एक काल्पनिक मालिका घेऊन येताहेत.  त्याबरोबरच प्रेक्षकांचे लाडके विनोदवीर या मालिकेतून पाहायला मिळणार आहेत. समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, प्रभाकर मोरे, इशा डे, दत्तू मोरे असे कलाकार या मालिकेत आहेत. प्रेक्षकांसाठी ही पर्वणी असणार आहे. आपल्या लाडक्या कलाकारांना एका नवीन भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' ही विनोदी मालिका प्रेक्षकांना नक्कीच भुरळ पाडेल यात शंका नाही. अवघ्या महाराष्ट्राला ही हास्याची मनी ॲार्डर नक्की आवडेल यात शंका नाही. ५ जानेवारीपासून गुरुवार ते शनीवार रात्री ९ वा.सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :सोनी मराठीसेलिब्रिटी