Join us

"मी ब्राह्मण जातीत जन्माला आलो ह्यात..."; अथर्व सुदामेला पाठिंबा देणारी मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:55 IST

रिल स्टार अथर्व सुदामेला सपोर्ट करणारी मराठी अभिनेत्याची परखड पोस्ट चर्चेत. व्हिडीओवर आक्षेप घेणाऱ्यांबद्दल अभिनेत्याने पोस्ट लिहिली आहे

मराठमोळा अभिनेता अभिजीत केळकर हा सामाजिक, राजकीय घटनांवर व्यक्त होताना दिसतो. अशातच सध्या रिल स्टार अथर्व सुदामेच्या व्हिडीओवर जो काही वाद झाला, त्यावर अभिजीतने लांबलचक पोस्ट लिहिली आहे. अभिजीतने पोस्ट लिहून अथर्वला समर्थन दिलं आहे. 

अभिजीत लिहितो, ''माझ्या देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, संरक्षणाची जबाबदारी सक्षमतेने पार पडणाऱ्या सोफिया कुरेशी, सनई वादक उस्ताद बिस्मिल्लाह खान, तबलानवाज उस्ताद अल्लारखा खान, झाकीर हुसेन, A R रेहमान, सानिया मिर्झा, महाराजांचं संरक्षण करणारे सैय्यद बंडा, तिन्ही खान, रफी साहेब, युसूफ खान, मधुबाला, नर्गिस, मीना कुमारी आणि असे अनंत... ह्यांच्याबद्दल आपल्या मनात प्रेम, आदर, अभिमान असेल आणि त्यांच्यावर प्रेम करताना त्यांचा धर्म कुठला हा विचार आपल्या मनातही येत नसेल...''

''मला गरज पडली तर माझ्यासाठी ज्याने रक्तदान केलं, डॉक्टर म्हणून उपचार केले, जेवताना ते धान्य ज्याने पिकवलं तो कुठल्या धर्माचा, जातीचा आहे हे मला विचारावंसं ही वाटत नसेल तर मग आपण जिला बुद्धीची देवता मानतो अशा गणपती बाप्पाची मूर्ती कोणी घडवली आहे, त्या माणसाची जात, धर्म कुठला आहे ह्याचा मला का फरक पडावा? मी ब्राह्मण जातीत जन्माला आलो ह्यात माझं काहीही कर्तृत्व नाही, ना माझ्या आई वडिलांनी जात पात मानण्याचे संस्कार माझ्यावर केले...''''सरकारी ठिकाणी, कागदपत्रांवर जात, धर्म लिहावा लागतो म्हणून नाईलाजाने मी तो लिहितो / लिहावा लागतो... जन्माने मिळालेला माझा हिंदू धर्म, जन्माने मला मिळालेली ब्राह्मण ही माझी जात, मला कुठलाही भेदभाव किंवा द्वेष करायला शिकवत नाही... उलट माझा हिंदू धर्म मला, वसुधैव कुटुंबकम हीच शिकवण देतो... हे असं असताना जर अथर्व सुदामे हाच संदेश आपल्या व्हिडिओतून देत असेल तर तो आपल्यातल्याच काही लोकांना का खटकावा???''

टॅग्स :अभिजीत केळकरटेलिव्हिजनमराठी चित्रपटमराठी अभिनेता