Join us

"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 17:09 IST

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर निलेश साबळेंसोबतचा फोटो शेअर करत तो म्हणतो...

'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या विनोदी कार्यक्रमाने १० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे ही स्टार मंडळी आपल्याला मिळाली. डॉ निलेश साबळेंनी शोमध्ये अप्रतिम सूत्रसंचालन केलं. तसंच ते लेखन, दिग्दर्शनाचंही काम करायचे. इतकंच नाही तर स्वत: मिमिक्रीही करायचे. हिंदी, मराठीतील अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये येऊन गेले. कार्यक्रमाचं दुसरं पर्व आता भेटीला येत आहे आणि यात निलेश साबळे दिसणार नाहीत. अभिनेता आयुष संजीवने (Aayush Sanjeev) पोस्ट शेअर करत या कार्यक्रमाबद्दल आणि निलेश साबळेंबद्दल (Nilesh Sabale)  भावना व्यक्त केल्या आहेत.

'बॉस माझी लाडाची' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता आयुष संजीवने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर निलेश साबळेंसोबतचा तो फोटो आहे. आयुष लिहितो, "“चला हवा येऊ द्या” हा कार्यक्रम माझ्यासाठी फक्त एक मंच नव्हता, तर झी मराठीने दिलेलं एक सुंदर गिफ्ट होतं. माझा पहिला व्हायरल व्हिडीओ इथूनच आला होता आणि अजूनही बरेच लोक मला त्या व्हिडिओमुळे ओळखतात. इथली संपूर्ण टीम ,कलाकार, दिग्दर्शक, प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट ,सगळेच अतिशय प्रेमळ, व्यावसायिक आणि कलाकारांना समजून घेणारे आहेत. नवोदित कलाकारांनाही इथं मोकळेपणाने व्यक्त होता येतं. डॉक्टर निलेश साबळे सरांनी मला ओळखून, समजून घेतलं आणि व्यक्त होण्याची संधी दिली – त्याबद्दल मी कायम आभारी आहे."

काही दिवसांपूर्वी निलेश साबळेंवर राशीचक्रकार शरद उपाध्येंनी फेसबुक पोस्ट लिहित आरोप केले होते. निलेश साबळेंनी हवा येऊ द्या च्या सेटवर त्यांना चांगली वागणूक दिली नाही. तासन् तास बसवून ठेवले, पाणी दिले नाही, कित्येक तासांनी स्टेजवर बोलवलं पण त्यांचं बरंचसं बोलणं नंतर कापलं असे अनेक मुद्दे लिहिले. यावर निलेश साबळेंनीही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सर्व आरोपांचं खंडन केलं. शरद उपाध्ये आणि निलेश साबळे यांच्यातील वाद चर्चेत होता. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी निलेश साबळेंना पाठिंबा दिला होता.

टॅग्स :मराठी अभिनेतानिलेश साबळेचला हवा येऊ द्या