तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे मुख्य भूमिकेत असलेली 'वीण दोघांतली ही तुटेना' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत तेजश्री स्वानंदी तर सुबोध भावे समर ही भूमिका साकारत आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे. या मालिकेत आता एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.
'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत स्वानंदी तिच्या लग्नासाठी एका मुलाला भेटायला जाते. हा मुलगा म्हणजे आशय कुलकर्णी आहे. आशय कुलकर्णीने 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत एन्ट्री घेतली आहे. स्वानंदीला भेटायला आलेला हा मुलगा तिचा अपमान करतो. "नमस्कार, मला थोडं वयाने लहान मुलीची अपेक्षा होती. ३५ म्हणजे जरा जास्तच आहे", असं आशय तिला म्हणतो. पुढे स्वानंदी "त्याला काय घेणार तुम्ही?" असं विचारते. यावरही तो तिला उलटच उत्तर देतो.
"घ्यायला तर बायको आलो होतो. पण आता उपासमार झाली. बरं या वयात तुम्हाला आता मूल होणं पण अवघड आहे. सगळीच बोंब आहे...", असं तो मुलगा स्वानंदीला म्हणतो. ते ऐकून स्वानंदी दुखावते. आणि रेस्टॉरंटमधल्या बॉशरुममध्ये जाऊन रडू लागते. तेवढ्यात समर तिथे येत असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. आता दुखावलेल्या स्वानंदीला समरची साथ मिळेल का? हे पाहावं लागेल.
'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत आशय कुलकर्णीला पाहून चाहते खूश आहेत. या प्रोमोवर त्यांनी कमेंट केल्या आहेत. "आशय कुलकर्णी व्हिलन म्हणजे सिरीयल हिट", "खूप छान आहे मालिका", "आशय तुला टीव्हीवर पाहणं म्हणजे सुख", अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.