मराठी बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये किरण माने (Kiran Mane) यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या शोमध्ये किरण माने यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असले तरी आपला या घरात येण्याचा उद्देश सफल झाला असे ते आवर्जून म्हणताना दिसले. या घरात त्यांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली होती तेव्हा त्यांच्या लाडक्या लेकीने सुद्धा प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली होती. किरण माने यांची लेक ईशा बिग बॉसच्या घरात आली तेव्हा तिने आपल्या बाबांना बिग बॉसची ट्रॉफी घेऊनच घरी यायचं अशी सक्त ताकीद दिली होती. दरम्यान आता किरण मानेंनी लेकीसाठी लिहिलेली स्पेशल पोस्ट चर्चेत आली आहे.
ईशा नाट्य क्षेत्राचे धडे गिरवत आहे आणि तिला सुंदर गाताही येते हे बिग बॉस मराठीच्या घरात प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. किरण माने यांच्या याच लेकीने आता धाडसाचे पाऊल उचलत कलाक्षेत्रात पदार्पण केलेलं आहे. पारंबी या संहितेचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः ईशाने केले आहे. रविवारी २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता नामदेव सभागृह, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे या संहितेचा पहिला प्रयोग सादर होणार आहे.
नाट्यक्षेत्रात आपल्या लेकीचं हे पहिलं पाऊल तिला यशाच्या शिखरावर नक्कीच नेऊन पोहोचवेल अशी आशा किरण माने यांना सुद्धा आहे. अभिनय क्षेत्राच्या जोडीलाच किरण माने यांना लिखाणाची आवड आहे. सोशल मीडियावर हटके अंदाजात त्यांचे अनेक लेख वाचकांना वाचायला मिळतात. त्यांचा हा गुण ईशाने सुद्धा अंगिकारला आहे. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन करून ईशा आता आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत कला क्षेत्रात येण्यास सज्ज झाली आहे.