मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) नुकतीच 'हॅशटॅग तदैव लग्नम' सिनेमात दिसली. सुबोध भावेसोबत पहिल्यांदाच तिची जोडी झळकली. सिनेमा नुकताच ओटीटीवर आला असून इथेही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तेजश्रीने सिनेमा, नाटक, मालिका सगळ्या क्षेत्रात काम केलं आहे. ओटीटी सीरिजवर ती फार दिसत नाही. दरम्यान एका मुलाखतीत तेजश्रीने ओटीटीबाबतीत स्पष्ट मत मांडलं आहे.
तेजश्री प्रधानने मिरची मराठीला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली, "ओटीटीच्या बाबतीत माझं एक ठाम मत आहे. कदाचित त्यामुळेच एवढे चांगले प्रोजेक्ट येऊनही मी करु शकलेले नाही. कारण माझ्या काही मर्यादा आहेत, बंधनं आहेत. न्यूडिटी, सेक्शिअॅलिटी, हिंसा हे खरंच प्रत्येक गोष्टीचा भाग असलेच पाहिजेत का या अट्टाहासाने जे हल्ली केलं जातंय ना तर ते मला जरा जास्त वाटतंय. त्याशिवाय सुद्धा एखादा गोड विषय आपण मांडू शकतोच."
ती पुढे म्हणाली, "मला साध्या विषयांवर बनलेल्या गोष्टींचं खूप अप्रुप वाटतं. लापता लेडीज किती सुंदर सिनेमा होता. माझं तेच म्हणणं आहे की खरंच कथेची गरज नसेल तर नका उगाच अट्टाहास करु. थोडं साधं घ्या ना..."
तेजश्रीने सध्या ब्रेक घेतला आहे. काही दिवसांपूर्वी ती 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून बाहेर पडली. त्यामुळे आता यापुढे ती कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.