Join us

"हसीना: द क्वीन ऑफ मुंबई"चा टीझर रिलीज

By admin | Updated: June 17, 2017 12:56 IST

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ‘हसीना : द क्वीन ऑफ मुंबई’ या सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17- अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ‘हसीना : द क्वीन ऑफ मुंबई’ या सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला झाला आहे. टीझरमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या आयुष्याची एक झलक दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने सिनेमात हसीन पारकरची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचा टीझर थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेला आहे, त्यामुळे आता सिनेमाविषयी प्रेक्षकांची अपेक्षा वाढली आहे.  1 मिनिट 5 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये, पती इब्राहिमच्या मृत्यूनंतर हसीनाचं आयुष्य कसं बदललं. त्या घटनेनंतर ती ‘नागपाड्याची गॉडमदर’ कशी बनली हे दाखविण्यात आलं आहे.टीझरच्या शेवटच्या सीनमध्ये हसीना कोर्टात उभी असून तिला नाव विचारलं जातं. यानंतर बॅकग्राऊंडमध्ये  ‘आपा याद रह गया ना! नाम याद रखने की ज़रूरत नहीं’, असा श्रद्धाचा दमदार डायलॉग ऐकायला मिळतो आहे. 
 
भारतीय गुन्हेगारी विश्वात दाऊद इब्राहिम या नावाची जी दहशत होती त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या त्याच्या कुटुंबियांच्या राहणीमानावर काय परिणाम झाला होता याचीच झलक ‘हसीना पारकर’ या सिनेमात दाखवण्यात आल्याची चर्चा आहे. दाऊदच्या बहिणीपासून सुरु झालेल्या हसीनाचा प्रवास ‘गॉडमदर’ आणि ‘गँगस्टर’पर्यंत येऊन कधी थांबला याचं चित्रण सिनेमात पाहायला मिळणार आहे.  टिझरपूर्वी श्रद्धाची मुख्य भूमिका असणाऱ्या या सिनेमाचं एक पोस्टर लाँच करण्यात आलं होतं. या पोस्टरमध्ये श्रद्धाच्या डोळ्यांत गडद सुरमा, सुरम्याच्या त्या रंगातूनही समोरच्याला घाबरवणारी भेदक नजर पाहायला मिळत होती. तिच्या या भूमिकेकडून अनेकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. अर्थात श्रद्धानेही रुपेरी पडद्यावर हसीना साकारण्यासाठी बरीच मेहनत घेतल्याचंही पाहायला मिळालं होतं. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती नाहिद खान करत असून, या सिनेमातून दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत खुद्द श्रद्धाचा भाऊच झळकणार आहे. सिद्धार्थ कपूर आणि श्रद्धा कपूर ही बहिण- भावाची जोडीसुद्धा या सिनेमातील आकर्षणाचा विषय ठरत आहे. १८ ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.