ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - सुमधुर गाणी, कॉलेजविश्वातील चुरशीची कथा, रोमँटिक वातावरण आणि सर्वच कलाकारांचा सरस अभिनय.. ९०च्या दशकात आलेल्या ' जो जीत वही सिकंदर' या चित्रपटाचे प्रत्येकाच्याच आयुष्यात एक महत्वपूर्ण आहे. आमिर खान-आयेशा जुल्का- पूजा बेदीचा प्रेमत्रिकोण, दीपक तिजोरी- मामिक सिंगची एकमेकांमधील स्पर्धा, जीवाला जीव देणारे मित्र, ' पहला नशा', 'वो सिकंदरही दोस्तो कहलाता है' यासारखी सुमधुर , रोमँटिक गाणी आणि ती शेवटची चुरशीची सायकल रेस या सर्व गोष्टींची जमून आलेली उत्तम भट्टी यामुळेच आजही हा चित्रपट 'ऑल टाइम फेव्हरिट' आहे.. २४ वर्षांनंतरही या चित्रपटाची जादू अद्यापही कायम असून तेच मॅजिक पुन्हा दाखवण्यासाठी ' जो जीत वही सिकंदर'मधील कलाकार पुन्हा एकत्र येणार आहेत, धम्माल करण्यासाठी...
निमित्त आहे ' मामी - १८ व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हल'चं.. येत्या २० ऑक्टोबरपासून हा फेस्टिव्हल सुरू होणार असून त्या निमित्त हे सर्व कलाकार एकत्र येणार आहेत. अभिनेता आमिर खान, मामिक सिंग, दीपक तिजोरी, देवेन भोजानी, आदित्य लाखिया, किरण झवेरी आणि पूजा बेदी या कलाकारांसह चित्रपटाचा दिग्दर्शक मन्सूर खान आणि कोरिओग्राफर फराह खान हे सर्वजण एकत्र जमून गप्पा मारत चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या गमती-जमती आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा आहेत.