Join us
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत "बाहुबली-2"च्या रिलीजवर टांगती तलवार

By admin | Updated: April 14, 2017 10:34 IST

तामिळनाडूमध्ये "बाहुबली 2" सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण...

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 14 - तामिळनाडूमध्ये "बाहुबली 2" सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. एकीकडे या मेगा बजेट सिनेमाच्या रिलीजची सर्वत्र तयारी जोरात सुरू आहे तर दुसरीकडे मद्रास हायकोर्टानं सिनेमाच्या वितरणाचे अधिकार असलेली कंपनी "श्री ग्रीन प्रॉडक्शन"च्या मालकाला नोटीस बजावली आहे. 
 
एका वितरकानं कोर्टात श्री ग्रीन प्रॉडक्शनच्या मालकाविरोधात कर्जाची रक्कम न दिल्याविरोधात याचिका दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर कोर्टानं संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे. 
 
दरम्यान, न्यायमूर्ती कल्याणसुंदरम यांनी 28 एप्रिल रोजी बॉक्सऑफिसवर रिलीज होणा-या मेगा बजेट सिनेमावर कोणत्याही प्रकारे बंदी आणलेली नाही. मात्र त्यांनी या तामिळनाडूमध्ये सिनेमाच्या वितरणाचे अधिकार असलेली कंपनी श्री ग्रीन प्रॉडकशनच्या एम.एस. श्रवणन यांना 18 एप्रिलपर्यंत उत्तर द्यायला सांगितले आहे. 
 
श्री ग्रीन प्रॉडक्शननं सिनेमाचे थिअटर एक्झिबिशन अधिकार तामिळनाडूमध्ये घेतले होते.  जानेवारी 2017 मध्ये कंपनीनं एस मीडियाकेड कर्जासाठी विनंती केली. यानंतर बाहुबली 2 रिलीजपूर्वी 10 लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम जोडून प्रभू देवा स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड द्यावी लागणार, या अटीवर लोन मान्य करण्यात आल्याचे एस मीडियाचं म्हणणं आहे. मात्र कर्जाची रक्कम चुकती न करताच श्री ग्रीन फिल्मनं वितरणाचे अधिकार तिस-याच कंपनीकडे हस्तांतर केले. 
 
1 फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या या करारातील अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप एस मीडियाने केला आहे. शिवाय कर्जाची रक्कम परत करायची नसल्यानंच त्यांनी तिस-या कंपनीसोबत मिळून सिनेमा रिलीज करण्याचा घाट घातला आहे, असा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे एस मीडियाचं कर्ज चुकवेपर्यंत कोर्टानं तामिळनाडूमध्ये "बाहुबली 2" च्या वितरक व प्रदर्शकांना सिनेमा रिलीज न करण्याचं आवाहन केले आहे.