Join us

“एक शून्य तीन” मधून सुमीत राघवन- स्वानंदी येणार रसिकांच्या भेटीला

By admin | Updated: November 15, 2016 17:48 IST

अभिनेता सुमीत राघवन व स्वानंदी टिकेकर लवकरच “एक शून्य तीन” नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - 'साराभाई व्हर्सेस साराभाई',  'बडी दूरसे आए है' या आणि अशा मालिका, चित्रपट व नाटकांमधून झळकणारा गुणी अभिनेता सुमीत राघवन लवकरच पुनहा रंगभूमीवर येत असून त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे 'दिल दोस्ती दुनियादारी’ फेम स्वानंदी टिकेकर.  “एक शून्य तीन” या नाटकाद्वारे दोघेही अभिनयाची जुगलबंदी दाखवणार असून प्रेक्षकही त्यांना एकत्र पाहण्यास खूप उत्सुक आहेत. 
रहस्यमय व थरारक  अशा या नाटकाचे दिग्दर्शन  नीरज शिरवईकर आणि सुदीप मोडक करणार असून यामध्ये सुमीत एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.अष्टपैलू अभिनेता असलेला सुमीत  'लेकुरे उदंड झाली’ या नाटकानंतर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचा करिष्मा दाखवणार असून गुणी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर नाटकात कॉम्प्युटर एक्स्पर्टची भूमिका रंगवणार आहे. सुमीत आणि स्वानंदी यांनी सोशल मीडियावर या नाटकाचे हटके पोस्टरदेखील अपलोड केले आहेत. ३ डिसेंबरला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईत रंगणार आहे.
' नाटकाची तालीम करताना खूप मजा आणि धमाल केली आहे. सुमीतसोबत काम करण्याचा अनुभवदेखील खूप भन्नाट होता. तो सीनिअर असल्यामुळे थोडी भीती वाटत होती. मात्र त्याने तसे काहीच जाणवू न दिल्याने मीही निर्धास्तपणे काम करू शकले' असा अनुभव स्वानंदीने लोकमत सीएनएक्सशी शेअर केला. '  हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल' असा विश्वासही तिने व्यक्त केला.