Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बाहुबली'लाही मागे टाकणाऱ्या 'भारत अने नेनू'ची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 14:50 IST

'भारत अने नेनू'चा अर्थ 'मी भारत' असा होतो. या सिनेमानं देशात कल्ला केला आहे.

मुंबईः भारतीय सिनेसृष्टीत सध्या 'भारत अने नेनू' या दाक्षिणात्य सिनेमानं प्रचंड कल्ला केला आहे. या चित्रपटानं चार दिवसांत जमवलेला १२५ कोटींचा गल्ला पाहून भले-भले चक्रावलेत. अमेरिकेतही या सिनेमानं 'याड' लावलंय. आता हिंदीसह अन्य भारतीय भाषांमध्येही 'भारत अने नेनू' डब होतोय. तसंच, या सिनेमाच्या नायकाचा - सुपरस्टार महेश बाबूचा मेणाचा पुतळा तर थेट मादाम तुसाँमध्ये विराजमान होणार आहे. या घडामोडी पाहता, एवढं काय आहे या सिनेमात, असा प्रश्न सगळ्यांना पडणं स्वाभाविकच आहे. तो लक्षात घेऊनच, या सिनेमाचा 'यूएसपी' आम्ही जाणून घेतला. तेव्हा, कथा आणि महेश बाबूचा तगडा अभिनय ही 'भारत अने नेनू'ची जमेची बाजू असल्याचं लक्षात आलं. 

'भारत अने नेनू'चा अर्थ 'मी भारत' असा होतो. आंध्र प्रदेश, तामिळनाडू इथली जनता दोन गोष्टींसाठी काहीही करू शकते. एक म्हणजे राजकारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिनेमा. या दोन्ही गोष्टी 'भारत अने नेनू'मध्ये जुळून आल्यात. म्हणजे, हा राजकारणावरचाच सिनेमा आहे. त्यामुळे दक्षिणेतील सिनेमावेडे 'सैराट' झालेत.

'भारत अने नेनू'ची गोष्ट...

आईच्या निधनामुळे लहान वयातच मायेचं छत्र हरपलेला भारत लंडनमध्ये काकांकडे जातो. तिथे शिकताना, पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय, याचा कुठलाच विचार त्याच्या डोक्यात नसतो. कॉलेजचे दिवस तो एन्जॉय करत असतो. इतक्यातच, त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी धडकते. ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असतात. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात एक पोकळी निर्माण होते. पक्ष अस्थिरता वाढत जाते आणि पक्ष फुटण्याचीही भीती असते. त्यामुळे पक्षाचे प्रमुख वरदराजन (प्रकाश राज) भारतला मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यास सांगतात. त्यानंतर, तो कशा पद्धतीने बदल घडवतो, विरोधकांचा - हितशत्रूंचा कसा सामना करतो, याभोवती सिनेमा फिरतो. त्यात, एका बाजूला भारतची लव्ह स्टोरीही फुलत जाते. 

वास्तविक, दक्षिणेत अशा कथानकाचे चित्रपट याआधीही आलेत. त्यांनीही दणक्यात कमाई केली आहे. पण, दोन दिवसांत १०० कोटींचा गल्ला जमवण्याचा विक्रम 'भारत अने नेनू'ने केला आहे. कारण, यातला तरुण-तडफदार मुख्यमंत्री प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. 'नायक'मध्ये आपण एक दिवसाचा मुख्यमंत्री पाहिलाय. शिवाजी राव ज्या धडाक्याने कामं करतो, ते पाहून आपल्यात एक वेगळाच जोश संचारतो. तसं या सिनेमाचं प्रत्येक दृश्य पाहताना होतं. त्यात, दक्षिणेच्या लोकांचं राजकारणवेड आणि ढिश्युम-ढिश्युमची क्रेझही सिनेमा 'हिट' होण्यामागचं कारण आहे. राजकारण या विषयावरील बहुतांश सिनेमांमध्ये व्हिलन गँग हिरोविरोधात वेगवेगळ्या चाली खेळते. पण, या सिनेमातला हिरो थेट गुंडाशी दोन हात करतो, त्यांना नामोहरम करतो. हे पाहून थिएटरमध्ये शिट्ट्यांचा पाऊस पडतो. 

'बाहुबली'चे दिग्दर्शक एस एस राजामौली यांनीही या सिनेमाचं आणि विशेषतः महेश बाबूच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलंय. असं असलं तरी, सिनेमाचा क्लायमॅक्स दिग्दर्शक कोरातला सिवा यांना तितकासा जमलेला नाही, तसंच काही गोष्टी अगदीच न पचणाऱ्याही आहेत. पण साउथचा सिनेमा म्हटलं की ते आलंच. आता 'भारत अने नेनू' हिंदीत डब होऊन आला की आपल्याकडेही त्यावर उड्या पडतील. ट्रेनमध्ये शेअर-इटद्वारे त्याचा जोरदार प्रचार आणि प्रसार होईल, हे नक्की!

टॅग्स :सिनेमाभारत अने नेनू