Premachi Gosht: छोट्या पडद्यावरील 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht) ही मालिका प्रेक्षकांना सर्वाधिक आवडणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेने अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 'प्रेमाची गोष्ट' मधील सागर-मुक्ताच्या जोडीने त्यांच्या मनावर गारुड घातलं आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका अव्वल स्थानावर असते. दरम्यान, प्रेक्षक त्यातील कलाकारांना त्यांच्या नावावरुन नाही तर पात्रांवरुन ओळखू लागले आहेत. अशातच नुकताच या मालिकेने यशस्वीरित्या ४५० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्ताने मालिकेतील कलाकारांनी जंगी सेलिब्रेशन केलंय.
सोशल मीडियावर 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीचं पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकरने खास व्हिडीओ शेअर केला आहे. मालिकेच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन करतानाची दृश्ये व्हिडीओच्या माध्यमातून तिने टिपली आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की,"प्रेमाची गोष्ट' मालिकेने ४५० भागांचा टप्पा पार केल्यानिमित्त संपूर्ण टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा. खरंतर हे यश संपूर्ण टीम आणि चॅनेलच्या मेहनतीचं आहे. सर्व आव्हाने आणि अडथळे असूनही ते पार करत आम्ही नेहमीपेक्षा मजबूत आणि एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. मला या प्रवासाचा भाग असल्याचा अभिमान आहे. पुढे असे अनेक यशस्वी टप्पे गाठण्यासाठी शुभेच्छा."
'प्रेमाची गोष्ट' ही मालिका गेली दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मागील काही दिवसांपासून ही मालिका बरीच चर्चेत आली होती. अभिनेत्री तेजश्री प्रधानने मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर प्रेक्षक काहीसे नाराज झाले होते. परंतु नव्या मुक्ताच्या अभिनयाचं कौतुक होताना दिसतंय.