स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं. यामुळे मोठा वाद निर्माण होऊन कुणाल कामराविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला आता 'बिग बॉस'ची ऑफर मिळाल्याचं समजत आहे.
कुणाल कामराला सलमान खानचा शो 'बिग बॉस'च्या नव्या सीझनसाठी विचारणा होत आहे. याबाबत खुद्द स्टँडअप कॉमेडियननेच खुलासा केला आहे. कुणाल कामराने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्याने 'बिग बॉस'ची ऑफर देणाऱ्या व्यक्तीसोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये ती व्यक्ती कुणाल कामराला 'बिग बॉस'बद्दल विचारत आहे. 'बिग बॉस'चं कास्टिंग बघत असल्याचं ही व्यक्ती म्हणत आहे.
"मी बिग बॉसच्या यंदाच्या सीझनचं कास्टिंग बघत आहे. काही इंटरेस्टिंग व्यक्तींच्या शोधात असताना तुझं नाव समोर आलं. तुझ्या लिस्टमध्ये हे नसेलही पण, या शोमुळे तुला तुझी खरी वाइब दाखवण्याचा आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. तुला याबद्दल काय वाटतं?" , असं ती व्यक्ती म्हणत आहे. यावर कुणाल कामराने त्याच्या स्टाइलमध्ये उत्तर दिलं आहे. "यापेक्षा मी मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती होईन", असं कुणाल कामरा म्हणाला आहे.
दरम्यान, कुणाल कामराला मेसेज करणारी व्यक्ती खरंच बिग बॉसच्या कास्टिंग टीममधली होती का, हे अद्याप समजलेलं नाही. पण, जर खरंच तसं असेल तर 'बिग बॉस १९' किंवा 'बिग बॉस ओटीटी ४'साठी त्याला विचारणा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.