Join us

श्री श्री रविशंकर आणि बॉलीवूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 21:13 IST

दिल्लीतील यमुनेच्या खोऱ्यात आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवामुळे चर्चेत असलेले आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर सध्या मीडियाच्या ठळक बातम्यांमध्ये दररोज झळकत आहेत

- anuj.alankar@lokmat.comदिल्लीतील यमुनेच्या खोऱ्यात आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवामुळे चर्चेत असलेले आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर सध्या मीडियाच्या ठळक बातम्यांमध्ये दररोज झळकत आहेत. या महोत्सवात देश-विदेशातून लाखो अनुयायी सहभागी झाले आहेत. यात बॉलीवूड कलाकारांचादेखील समावेश आहे. त्यात लारा दत्ता आणि दिया मिर्झा यांचे नाव आघाडीवर आहे. लारा दत्ताने बऱ्याचदा बेंगळुरू येथे रविशंकर यांचे प्रवचन ऐकण्यासाठी हजेरी लावली आहे, तर दिया मिर्झाचे म्हणणे आहे की, ‘आर्ट आॅफ लिव्हिंगमुळे माझ्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत.’ या दोन अ‍ॅक्ट्रेसप्रमाणे इतरही बरेचसे कलाकार रविशंकर यांचे भक्त आहेत. परेश रावल आणि अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला उमेश शुक्ला दिग्दर्शित ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा चित्रपटातील धर्मगुरूची भूमिका चर्चेचा विषय ठरली होती. कारण धर्मगुरूच्या भूमिकेत असलेल्या मिथुन चक्रवर्तींची भूमिका श्री श्री रविशंकर यांच्यावर आधारित असल्याचे बोलले जात होते. मात्र, उमेश शुक्लाने या चर्चेला पूर्णविराम देत श्री श्री रविशंकर यांचा भूमिकेशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते, परंतु जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा रविशंकर यांनी स्वत: प्रतिक्रिया देताना ऐशआरामात आयुष्य जगणारे बॉलीवूड कलाकार आध्यात्माबाबत संवेदनशील नसल्याची टीका केली होती. रविशंकर यांनी आमीर खानच्या ‘पीके’ या चित्रपटाचे मात्र तोंडभरून कौतुक केले होते. कारण या चित्रपटाची तीन दिवसांची शूटिंग रविशंकर यांच्या आश्रमात झाली होती.