भारतातील आजच्या आघाडीचे सुपरस्टार्स म्हटले की त्यात एक नाव हमखास सामील असतं ते म्हणजे प्रभास (Prabhas). साऊथचा 'रेबल स्टार' प्रभासने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा मिळवली आहे. एकाहून एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या प्रभासचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. मात्र, यावेळी तो अभिनयामुळे नव्हे, तर दिलेल्या 'धमकी'मुळे चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे ही धमकी त्याने रागात दिलेली नाही, तर मैत्रीतून दिलेली आहे. आता ही धमकी नेमकी कोणाला आणि कशासाठी दिली? चला जाणून घेऊया.
सध्या 'कन्नप्पा' या बहुप्रतिक्षित चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात प्रभाससोबत मोहनलाल आणि विष्णू मंचूदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे २०० कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या या भव्य चित्रपटात प्रभास आणि मोहनलाल यांनी काम केलं असलं, तरी त्यासाठी त्यांनी एक पैसाही घेतलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.
नुकतंच एका मुलाखतीत विष्णू मंचू यांनी प्रभास आणि मोहनलाल यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनं सांगितलं की, "मोहनलाल यांनी केवळ एका मिनिटाची भूमिका स्वीकारली, तीही केवळ माझ्या वडिलांसाठी. आणि आशियातील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या प्रभासनं फक्त माझ्या एका विनंतीवर हा प्रोजेक्ट स्वीकारला". विष्णू पुढे म्हणाले, "जेव्हा मी त्यांच्याकडे मानधनाबद्दल बोललो, तेव्हा दोघेही मला ओरडले", मोहनलाल मला म्हणाले, "तू माझ्यासमोर मोठा झालास आणि आता मला पैसे देणार?". तर प्रभासने "पैसे दिलेस तर मी तुला ठोकून काढेन", अशी थेट धमकीच दिल्याचं विष्णूनं सांगितलं.
अक्षय कुमारने घेतलं कमी मानधन
या चित्रपटात केवळ प्रभास आणि मोहनलालच नव्हे, तर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारही दिसणार आहे. विष्णू मंचूच्या मते, अक्षयनेदेखील आपल्या नेहमीच्या मानधनापेक्षा खूपच कमी रक्कम स्वीकारली आहे.