Join us

दिग्गज अभिनेत्री मीना गणेश काळाच्या पडद्याआड; रंगभूमी अन् सिनेविश्वातील तारा निखळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:42 IST

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मीना गणेश यांचं दुःखद निधन झालंय

मल्याळम सिनेविश्वातील चर्चेतील अभिनेत्री मीना गणेश यांचं निधन झालंय. आज गुरुवारी १९ डिसेंबरला हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मीना गणेश यांनी अखेरचा श्वास घेतला. स्ट्रोक आल्याने मीना यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यानच मीना यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ८१ वर्षांच्या होत्या. मीना यांच्या निधनाने मल्याळम इंडस्ट्रीतील एक तारा निखळल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.

मीना यांनी रंगभूमी अन् सिनेमे गाजवले

मीना यांनी त्यांच्या कारकीर्दीत १०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं. त्यांनी रंगभूमीपासून त्यांच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. पुढे मणि मुजक्कम सिनेमातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. पुढे 'मंडनमार लोंदानिल', 'उत्सव मेलम', 'गोलंथरा वर्था', 'सक्षल श्रीमन चथुन्नी', 'कल्याण सौगंधिकम', 'सियामी इरत्तकल', 'श्रीकृष्णपुराथे नक्षत्रथिलक्कम' अशा सिनेमांतून मीना यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसोबत केलंय काम

मीना यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर, थिएटर आर्टिस्ट ए.एन.गणेशन यांच्यासोबत मीना यांनी लग्न केलं. मीना यांनी सध्याच्या अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसोबत अभिनय केलाय. पृथ्वीराज सुकुमारन,  मोहनलाल, मामूटी अशा सिनेमांमधून मीना यांनी काम केलंय. मीना यांच्या निधनाची दुःखद बातमी कळताच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

टॅग्स :Tollywood