कन्नडसह दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. आज १४ जुलै रोजी सकाळी बंगळुरूमधील मल्लेश्वरम येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला झाले. त्या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. सरोजा यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कन्नड सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींसाठी सरोजा देवी या प्रेरणास्थान होत्या. सरोजा यांनी हिंदी सिनेसृष्टीत दिलीप कुमार यांच्यासारख्या दिग्गजाबरोबर काम केलंय. जाणून घ्या त्यांच्या कारकीर्दीबद्दल
सरोजा यांची कारकीर्द
सरोजा देवींचा जन्म ७ जानेवारी १९३८ रोजी बंगळुरूमध्ये झाला होता. केवळ १७ वर्षांच्या वयात त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी १९५५ साली 'महाकवी कालिदास' या कन्नड चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये सुमारे २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी एम. जी. रामचंद्रन, एन. टी. रामाराव, दिलीप कुमार, शिवाजी गणेशन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. १९५८ मध्ये आलेल्या 'नदोदी मन्नन' या तमिळ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्या काळात त्या दक्षिण भारतातील पहिल्या महिला सुपरस्टार मानल्या जायच्या.
सरोजा यांच्या अभिनयासाठी त्यांना 'अभिनया सरस्वती' आणि 'कन्नडथू पैंगिली' अशी उपाधी देण्यात आली होती. भारत सरकारने पद्मश्री (१९६९) आणि पद्मभूषण (१९९२) या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं. त्यांनी अभिनयाबरोबरच विविध सांस्कृतिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. सरोजा देवी यांचे निधन ही संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोठी हानी आहे, याशिवाय त्यांच्या जाण्याने एक सुवर्णयुग संपल्याची भावना अनेक कलाकारांनी व्यक्त केली आहे. आज अनेक कलाकार त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार असून त्यांना श्रद्धांजली देणार आहेत.