"जन नायगन" (Jana Nayagan) हा थलपती विजय (Thalapathy Vijay) यांचा आगामी चित्रपट आहे. ज्याचा अर्थ "लोकांचे नेते" असा आहे. हा चित्रपट ९ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. एच.विनोद यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट हा थलपती विजयचा शेवटचा चित्रपट असणार आहे. शेवटचा कारण या चित्रपटानंतर विजय पूर्णपणे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करणार आहे. कदाचित म्हणूनच या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता आहे. हा चित्रपट भव्य दिव्य बनवण्यासाठी निर्माते कोणतीही कसर सोडत नाही आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार चित्रपटाचे हक्क विक्रमी किमतीत विकले गेले आहेत.
डेक्कन हेराल्डच्या वृत्तानुसार, 'जन नायगन' च्या सॅटेलाइट हक्कांबाबत अनेक स्टुडिओमध्ये वाद सुरू आहे. परंतु निर्मात्यांनी सन टीव्हीसोबत हा करार अंतिम केला आहे. 'जन नायगन' चे सॅटेलाइट हक्क ५५ कोटी रुपयांना विकले गेल्याचे वृत्त आहे. हा कोणत्याही तमिळ चित्रपटासाठी सर्वात मोठा करार आहे. यापूर्वी चित्रपटाच्या ओटीटी कराराबद्दल बातम्या आल्या होत्या. या चित्रपटाचा ओटीटी करार अमेझॉन प्राइम व्हिडीओसोबत झाला असल्याची बातमी आली होती. या तमिळ चित्रपटाचे हक्क अमेझॉनने १२१ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. तसेच या चित्रपटात थलापती विजयनं २७५ कोटी रुपयांची फी घेत असल्याचे मनी कंट्रोलने वृत्त दिलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील ही सर्वाधिक फी आहे.
'जन नायगन' विषयी आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे, हा चित्रपट नंदमुरी बालकृष्ण यांच्या २०२३ मधील ‘भगवंत केसरी’ या चित्रपटाचा रिमेक असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. थलपती विजयसोबत 'जन नायगन'मध्ये अभिनेत्री पूजा हेगडे पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात बॉबी देओल, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज, नारायण, प्रियमणी, ममिता बैजू, मोनिशा ब्लेसी आणि वरलक्ष्मी सरथकुमार यांच्यासह इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.