Join us

बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:01 IST

Singer Suchitra : सिंगर आणि रेडिओ जॉकी असलेल्या सुचित्राने तिचा बॉयफ्रेंड आणि उच्च न्यायालयाचा वकील शुनमुगराजवर घरगुती हिंसाचार, आर्थिक शोषण आणि तिच्या संपत्तीचा बेकायदेशीर वापर केल्याचा गंभीर आरोप केला.

सिंगर आणि रेडिओ जॉकी असलेल्या सुचित्राने तिचा बॉयफ्रेंड आणि उच्च न्यायालयाचा वकील शुनमुगराजवर घरगुती हिंसाचार, आर्थिक शोषण आणि तिच्या संपत्तीचा बेकायदेशीर वापर केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तिने इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर करून तिच्यासोबत झालेला अत्याचार सांगितला आहे. सुचित्रा शुनमुगराजला अनेक वर्षांपासून ओळखते.

"शुनमुगराज माझ्या आयुष्यात अशा वेळी आला जेव्हा मी वाईट काळामधून जात होते. तो माझ्या आयुष्यात एक सेफ गार्ड म्हणून आला. पण नंतर मला कळलं की त्याने माझ्या मनाचा आणि पैशाचा फायदा घेतला. माझं सर्व काही लुटलं. आमचं नातं हिंसक झालं. मला अनेक वेळा मारहाण करण्यात आली. शुनमुगराजने मला WWE रेसलरप्रमाणे लाथ मारली. मी एका कोपऱ्यात बसून रडायची आणि त्याला थांबण्याची विनंती करायची."

"माझ्या कष्टाचे पैसे चोरले"

"कर्म काहीही असो, मी एक महिला म्हणून हार मानणार नाही. या शुनमुगराजने माझ्या कष्टाचे पैसे चोरले, जी गाणी तुम्हाला सर्वांना आवडली होती. त्या गाण्यांमधून मी पैसे कमावले होते. ते सर्व पैसे चोरले. माझ्या वस्तूंचा गैरवापर केला. माझ्या चेन्नईतील घरावर कब्जा केला. त्यानंतर मी मुंबईत राहायला गेले, जिथे मी गेल्या काही महिन्यांपासून काम करत आहे. त्याने माझे सर्व पैसे घेतले, माझं घर घेतलं, माझ्यासाठी काहीही ठेवलं नाही. हे सांगणं मला मूर्खपणाचं वाटतं, पण हे खरं आहे" असं सुचित्राने म्हटलं आहे. 

"माझ्यासाठी हा सर्वात मोठा धक्का"

सुचित्राने असाही आरोप केला की, शुनमुगराजने लग्नाबद्दल खोटं सांगितलं. तो विवाहित आहे हे त्याने तिच्यापासून लपवलं. "मला नंतर कळलं की, त्याचा कधीच घटस्फोट झाला नाही. त्याची पहिली पत्नी माझ्याकडे आली आणि त्याला परत नेण्याची विनंती केली. माझ्यासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. मी आता न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात जाईल. आता हा अन्याय सहन करणार नाही" असं देखील सुचित्राने म्हटलं आहे.  

टॅग्स :Tollywoodगुन्हेगारी