Sequels From South Cinema: साऊथ फिल्म इंडस्ट्रीने केवळ दक्षिणेत किंवा बॉलिवूडमध्येच नाही तर संपूर्ण जगभरात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा', प्रभासचा 'सालार' आणि 'कल्की 2898 AD' यांसारख्या चित्रपटांनी बॉलिवूडपेक्षा अधिक कमाई करत प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी छाप सोडली आहे. याच कारणामुळे आता प्रेक्षक या सुपरहिट चित्रपटांच्या सिक्वेलची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
प्रभासच्या 'सालार: द सीजफायर' ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाच्या पोस्ट-क्रेडिट सीनमध्येच 'सालार २: शौर्यांग पर्वम'ची घोषणा करण्यात आली होती. हा सिक्वेल २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या भागात प्रभाससोबत पुन्हा पृथ्वीराज सुकुमारन दिसणार आहेत. याशिवाय प्रभासच्या 'कल्की 2898 AD' या चित्रपटाने देशात ६४६.३१ कोटींची तर जागतिक पातळीवर तब्बल १०४२.२५ कोटींची कमाई केली होती. या अभूतपूर्व यशानंतर 'कल्की 2898 AD'च्या सिक्वेलची अधिकृत घोषणा झाली आहे. प्रभासचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राईज' हा २०२१ रोजी प्रदर्शित झाला आणि ब्लॉकबस्टर ठरला. यानंतर २०२४ मध्ये 'पुष्पा २: द रूल' प्रदर्शित झाला आणि त्यानेही कमाईचे नवे विक्रम केले. आता 'पुष्पा ३: द रामपेज'ची घोषणाही करण्यात आली आहे. हा तिसरा भाग २०२८मध्ये रिलीज होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
याशिवाय, ज्युनिअर एनटीआरचा 'देवरा – पार्ट १' २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही, तरी मेकर्सनी दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. या चित्रपटातून जान्हवी कपूरने साउथमध्ये पदार्पण केलं होतं. तसेच प्रशांत वर्मा दिग्दर्शित 'हनुमान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. यानंतर 'जय हनुमान' या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. 'हनुमान'मध्ये तेजा सज्जा मुख्य भूमिकेत होते, तर सिक्वेल 'जय हनुमान'मध्ये ऋषभ शेट्टी मुख्य भुमिकेत असणार आहे.