Join us

नाचो नाचो! लंडनमधील 'मादाम तुसा'मध्ये राम चरणचा मेणाचा पुतळा, 'या' खास गोष्टीने वेधलं सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 12:01 IST

बॉलिवूड अभिनेता राम चरणच्या पुतळ्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. लंडनच्या मादाम तुसा म्यूझियममध्ये हा पुतळा बसवण्यात आला आहे.

RRR सिनेमाचा जगात डंका वाजला. या सिनेमाला बेस्ट गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कारही मिळाला. अभिनेता राम चरण आणि अभिनेता ज्युनिअर एनटीआर या कलाकारांनी RRR सिनेमात प्रमुख भूमिका साकारली. अशातच या सिनेमातील राम चरणच्या (ram charan)  करिअरमध्ये त्याला मोठा सन्मान मिळाला आहे. राम चरणचा मेणाचा पुतळा लंडनमधील जगप्रसिद्ध मादात तुसा म्यूझियममध्ये  बसवण्यात आला आहे. या पुतळ्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. त्यावेळी एका खास गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधलं.

राम चरणचा मेणाचा पुतळा

आज रविवारी टॉलिवूड स्टार राम चरणच्या लंडनमधील पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. राम चरणने स्वतः या पुतळ्यावरील पडदा हटवला. या आनंदाच्या क्षणी रामचे आई-बाबा चिरंजीवी आणि सुरेखा, त्याची पत्नी उपासना आणि त्यांचा पेट डॉग राइम उपस्थित होते. म्यूझियममध्ये प्रवेश घेण्यापूर्वी रामच्या चाहत्यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. राम चरणच्या मेणाच्या पुतळ्याची खास गोष्ट ही आहे की, राम चरणचा लाडका पेट डॉग राइमची प्रतिकृतीही यात बघायला मिळतेय. या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी राम चरणने प्रसारमाध्यमांसोबत खास फोटोसेशन केलं. त्यावेळी रामचरणचा पेट डॉग राइमच्या क्यूटनेसने सर्वांचं लक्ष वेधलंय. 

राम चरणचं वर्कफ्रंट

जगप्रसिद्ध मादाम तुसा म्यूझियममध्ये पुतळा उभारल्यामुळे राम चरणच्या करिअरसाठी ही मोठी गोष्ट आहे. राम चरणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर RRR सिनेमानंतर राम चरणकडे सध्या विविध सिनेमांच्या ऑफर आहेत. २०२५ च्या सुरुवातीलाच राम चरणची भूमिका असलेला 'गेम चेंजर' सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमीश्र प्रतिसाद मिळाला. आता राम चरणच्या आगामी 'पेद्दी' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.

टॅग्स :राम चरण तेजामॅडम तुसाद संग्रहालयआरआरआर सिनेमाTollywoodबॉलिवूड