Rishab Shetty Kantara: अभिनता ऋषभ शेट्टीची प्रमुख भूमिका असलेला 'कांतरा' हा सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा त्यावेळी प्रचंड गाजला. त्यानंतर कांतराच्या सीक्वलची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. अलिकडेच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली होती. त्यात आता 'कांतारा-२' बद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'कांतारा २' च्या सेटवर एका ज्युनियर आर्टिस्टचा मृत्यू झाला आहे. या घटनेने 'कांतारा-२' सिनेमाच्या सेटवर सर्वांनाच चांगला धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मुळचा केरळचा असणारा ज्यूनिअर आर्टिस्ट एमएफ कपिलचा ऋषभ शेट्टी यांच्या या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मृत्यू झाला. काल मंगळवारी दुपारी कोल्लूर सौपर्णीका नदीत बडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएफ कपिल सेटवर लंच ब्रेकनंतर पोहण्यासाठी गेला असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो वाहून गेला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी ताबडतोब बचाव कार्य सुरु केले. त्यानंतर या ज्युनियर आर्टिस्टचा मृतदेह संध्याकाळी नदीत आढळला. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. या दुर्दैवी घटनेमुळे 'कंतारा २' च्या शूटिंगवरही परिणाम झाला आहे.
अलिकडेच अभिनेता रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाच्या सेटवर देखील अशीच घटना घडली होती. सिनेमाच्या सेटवर शूटिंगनंतर पोहायला गेलेल्या एका डान्स आर्टिस्ट नदीपात्रात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच कांतरा-२ बद्दल ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.