तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रवी मोहन (जयम रवीने अधिकृतपणे नाव बदलून रवी मोहन केलंय) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे. २००९ मध्ये रवी मोहन आणि आरती यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता. पण, १५ वर्षांनंतर हे नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. या जोडप्याला दोन मुलं आहेत. सध्या अभिनेत्याकडून दाखल करण्यात आलेल्या घटस्फोटाच्या अर्जावर न्यायालयीन कार्यवाही सुरु आहे. रवी मोहनने हे लग्न टिकवायचं नसल्याचं स्पष्ट केलंय. तर आरतीने महिन्याला लाखो रुपयांची पोटगी मागितली आहे. पुढील सुनावणीत या प्रकरणावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
रवी मोहनने सप्टेंबर २०२४ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची घोषणा केली होती. मग नोव्हेंबरमध्ये चेन्नई कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र, आरतीने त्यावर प्रतिक्रिया देताना, आपल्याला याबाबत काहीच कल्पना नसल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं होतं. यानंतर रवी मोहन आणि आरती यांच्यात वाद चव्हाट्यावर आला.
घटस्फोटाचा निर्णय न्यायालयाकडून देण्यात आलेला नसला, तरीही नुकताच अभिनेता गर्लफ्रेंड केनिशा फ्रान्सिसबरोबर एका लग्नात पोहोचला होता. रवी मोहननं यांच्या कथित गर्लफ्रेंड केनिशा फ्रान्सिसवर त्यांच्या वैवाहिक आयुष्याला तडा दिल्याचा आरोप केला आहे. तर जयम रवी यांनी केनिशाला आपल्या आयुष्यातील "रोशनी" असं म्हटलं. मात्र, यावर प्रत्युत्तर देताना आरती म्हणाली की, "या 'रोशनी'ने माझ्या आयुष्यात फक्त अंधारच आणला आहे. आरतीनं स्पष्टपणे सांगितलं की, त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा अंत 'तिसऱ्या व्यक्ती'मुळे झाला आहे.
अभिनेत्याकडून दाखल झालेल्या घटस्फोटाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं जोडप्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर काही दिवस दोघांनी न्यायालयात हजेरी लावली. पण, अभिनेत्यानं पुन्हा २१ मे रोजी झालेल्या न्यायालयीन सुनावणीत घटस्फोटाची विनंती केली होती. त्यासोबतच आरतीकडून दाखल केलेली पुन्हा एकत्र यायची याचिका फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली होती. आता न्यायाधीशांनी दोघांनाही त्यांच्या याचिकांवर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आणि प्रकरणाची सुनावणी १२ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. समोर आलेल्या अहवालानुसार, घटस्फोटासाठी आरतीने जयम रवीकडून महिन्याला ४० लाख रुपयांची पोटगी मागितली आहे.