Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर आपल्या मूळ गावी रश्मिकाला घेऊन गेला विजय देवरकोंडा, गावकऱ्यांकडून जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 18:11 IST

२६ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकल्यानंतर, हे नवविवाहित जोडपं विजयच्या वडिलोपार्जित गावी पोहचलं.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकं जोडपं विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना सध्या आपल्या लग्नामुळे देशभर चर्चेत आहेत. २६ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकल्यानंतर, हे नवविवाहित जोडपं काल विजयच्या वडिलोपार्जित गावी पोहचलं. हे गाव तेलंगणातील थुम्मनपेट हे आहे.  विजय  आणि रश्मिकाला पाहण्यासाठी संपूर्ण गावाने एकच गर्दी केली होती.

विजय आणि रश्मिकाने त्यांच्या नवीन फार्महाऊसमध्ये पारंपारिक पद्धतीने गृहप्रवेश केला. यावेळी या जोडप्याने श्री सत्यनारायण स्वामी पुजेमध्येही श्रद्धेने सहभाग घेतला. या धार्मिक विधीसाठी कुटुंबातील सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. एकमेकांचा हात धरून चालणाऱ्या या जोडीची केमिस्ट्री पाहून चाहते खूश झाले आहेत. या खास प्रसंगी विजयने हलक्या हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता, तर रश्मिका गडद निळ्या रंगाच्या रेशमी साडीत अतिशय सुंदर दिसत होती. त्यांच्या साध्या पण मोहक लूकचे फोटो आणि व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.

४ मार्चला हैदराबादमध्ये शाही रिसेप्शनआता चाहत्यांचं लक्ष 'विरोश'च्या रिसेप्शनकडे लागले आहे.  ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळींसाठी एका भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याबाबत जोडप्याने अधिकृत निवेदन जारी केले असून, सुरक्षेच्या कारणास्तव केवळ निमंत्रितांनाच प्रवेश दिला जाणार आहे. चाहत्यांची होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता, प्रशासनाच्या सल्ल्यानुसार रिसेप्शनसाठी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. "लग्नाबाबतचा देशभर असलेला उत्साह पाहता आम्ही सुरक्षेला प्राधान्य देत आहोत, कृपया सर्व चाहत्यांनी सहकार्य करावे", असे आवाहन या जोडप्याने केले आहे.

टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडा