Join us

अंत्यसंस्कार करुन परतत होते राजामौली, इतक्यात समोर सेल्फी घेण्यासाठी आला फॅन, पुढे घडलं असं काही की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:21 IST

एस. एस. राजमौलींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सध्या खूप चर्चा आहे. काय घडलं नेमकं?

प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी मनोरंजन विश्वात 'बाहुबली', RRR सारखे सुपरहिट सिनेमे दिग्दर्शित केले. एरवी शांत स्वभावाचे असणारे राजामौली सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. ज्यात ते भडकलेले दिसत आहेत. त्यांनी एका चाहत्याला ढकलल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार दिग्गज अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी घडला. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

राजामौलींचा व्हिडीओ व्हायरल

राजामौली आपल्या पत्नीबरोबर कोटा श्रीनिवास राव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक जमले होते. बाहेर पडताना एक चाहता त्यांच्याजवळ येऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच क्षणी राजामौली चिडलेले दिसतात. त्यांनी चाहत्याला टाळण्याचा प्रयत्न केला. पण तो चाहता राजामौलींच्या जवळ आला. त्यामुळे राजामौली त्या व्यक्तीच्या पाठीला हात लावून त्याला दूर ढकलताना दिसले. हा व्हिडीओ तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला.

राजामौली यांची कृती योग्य की अयोग्य?

या प्रकारावर अनेकजण सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी राजामौलींच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली, तर अनेकांनी त्यांचं समर्थन करत सांगितलं की, तो एक भावनिक क्षण होता आणि अशावेळी चाहत्याने सेल्फी घेणं योग्य नव्हतं. राजामौली हे शांत आणि नम्र स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांचा असा रागावलेला अवतार पाहून चाहत्यांनाही आश्चर्य वाटलं. दरम्यान दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील खलनायकी भूमिका गाजवलेले कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनामुळे कलाकार आणि साउथ इंडस्ट्रीवर शोककळा पसरली.

टॅग्स :एस.एस. राजमौलीबॉलिवूडTollywood