अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा २: द रुल' (Pushpa: The Rule) चा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. बिहारच्या पटनामध्ये भव्य समारोहात सिनेमाचा ट्रेलर लाँच पार पडला. यासाठी लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती. तर युट्यूबवर ट्रेलरला काही तासातच 20 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. २ मिनिट ४८ सेकंदाचा हा ट्रेलर अंगावर शहारे आणणारा आहे. ज्यांनी प्रत्यक्ष लाँच इव्हेंटमध्ये मोठ्या पडद्यावर ट्रेलर अनुभवला ते खरोखर नशिबवानच आहेत. पण मेकर्सने 'पुष्पा 2'चा ट्रेलर पटना शहरातच का लाँच केला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. याचं कारण आता समोर आलं आहे.
'पुष्पा २: द रुल' चे साऊंड रेकॉर्डिस्ट रेसुल पुकुट्टी यांनी नुकतीच 'झूम'ला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, "पुष्पा २ चा ट्रेलर पटना शहरात लाँच करण्याचं एकमेव कारण म्हणजे तिथली जनता ही सामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करते."
'पुष्पा:द राईज' हिट झाल्यानंतर तीन वर्षात याचा सीक्वेल आता येत आहे. पुष्पाचा पहिला भाग बिहारमधील प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला होता. पुष्पाची चालढाल, त्याचे डायलॉग्स, डान्स स्टाईल सगळंच तेथील लोकांनी कॉपी केलं होतं. 'श्रीवल्ली' हे गाणं तर तिथे इतकं गाजलं की तेथील एका भोजपुरी गायकाने याचं भोजपुरी व्हर्जनही बनवलं. सिनेमा टीव्हीवर रिलीज झाल्यानंतर बिहारमध्येच तो सर्वात जास्त पाहिला गेला होता. त्यामुळे मेकर्सने तेथील जनतेचे आभार या पद्धतीने मानले.
'पुष्पा: द रुल' ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फाजिल मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेत्री श्रीलीलाचं आयटम साँग आहे. आधी हा सिनेमा या वर्षी स्वातंत्र्यदिनाला रिलीज होणार होता. परंतु अनेकदा सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.