मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि कला दिग्दर्शक दिनेश मंगळूर यांचे ५५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. सोमवारी सकाळी कुंडूपूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिनेश हे रंगभूमी आणि चित्रपट अशा दोन्ही माध्यमांमधील एक अनुभवी व्यक्तिमत्व होते. दिनेश यांनी अनेक उत्तम भूमिका साकारल्या. याशिवाय त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिकाही चांगल्याच गाजल्या. दिनेश यांच्या पश्चात पत्नी भारती आणि दोन मुले पवन व सज्जन असं कुटुंब आहे.
दिनेश यांना 'कांतारा' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर बंगळुरु येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. परंतु गेली वर्षभर ब्रेन हेमरेज झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कन्नड चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे काम केल्यानंतर, दिनेश यांना 'केजीएफ' या ब्लॉकबस्टर चित्रपटात मुंबईतील एका डॉनची भूमिका साकारायची संधी मिळाली. दिनेश यांना या भूमिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. मूळचे मंगळूरुचे असलेले दिनेश यांनी रंगभूमीच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर 'नंबर ७३, शांतिनिवास' सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी यशस्वी कला दिग्दर्शक म्हणूनही काम केले. उत्कृष्ट कलात्मत कौशल्यामुळे दिनेश यांची ही वेगळी बाजू सर्वांना समजली.
दिनेश यांची सिनेकारकीर्द समृद्ध करणारी आहे. दिनेश यांनी 'आ दिनगालू', 'उलिदवरु कंदांथे', 'रिकी', 'राणा विक्रमा' आणि 'अंबारी' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून, अनेक सहकलाकार आणि चाहत्यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दिनेश यांचे पार्थिव बंगळूरु येथील निवासस्थानी आणल्यानंतर सुमनहल्ली स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.