या वर्षातील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया चित्रपटाच्या निर्मात्यांनी, 'कांतारा: अध्याय १' (Kantara: Chapter 1) या बहुप्रतिक्षित सिनेमासाठी बॉलिवूड अभिनेता गुलशन देवय्या(Gulshan Devaiah)चा कुलशेखर या भूमिकेतील पहिला लूक प्रदर्शित केला आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर कांताराच्या या प्रीक्वलमध्ये गुलशनची एन्ट्री झाली असून या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
लेखन आणि दिग्दर्शन ऋषभ शेट्टीचे असून तोच पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. कांतारा: अध्याय १ हे पूर्वीच्या कथानकाचा विस्तार करत एक नवे अध्याय उघडणार आहे. पहिल्या भागाने जसा लोककथा, अध्यात्म आणि मानवी भावना यांचा सुंदर संगम घडवून मांडणीला नवे मापदंड दिले, तसा हा प्रीक्वेल त्या कथानकाच्या मुळाशी जाऊन आणखी गहिरे आणि प्रभावी स्तर उलगडणार आहे.
या चित्रपटाचे छायाचित्रण अरविंद एस. कश्यप यांचे असून, संगीत बी. अजनिश लोकनाथ यांचे आहे – ज्यांच्या संगीताने पहिल्या भागात प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. विजय किराबंदूर यांची निर्मिती असलेल्या होम्बळे फिल्म्सच्या बॅनरखाली बनणारा हा चित्रपट दर्जेदार निर्मितीमूल्यांसाठी ओळखला जातो. गुलशन देवय्याचा कुलशेखर या भूमिकेतील पहिला लूक प्रेक्षकांसमोर येताच त्याचे पात्र कथानकात कशा प्रकारे गुंफला जाईल याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हा भव्य चित्रपट २ ऑक्टोबर, २०२५ ला प्रदर्शित होणार असून,कन्नड, तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी या सात भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल.