गणेशोत्सव देशभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. बॉलिवूड सुपरस्टारप्रमाणे दाक्षिणात्य कलाकारांनी त्यांच्या घरी गणपती बाप्पाचं स्वागत केले. अनेक सेलिब्रिटींच्या घरातून गणपती बाप्पा मोरयाचा नाद घुमत आहे. महेश बाबूच्या घरीही गणपती बाप्पाची स्थापना झाली आहे. महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकरने सोशल मीडियावर त्यांच्या बाप्पाचं दर्शन चाहत्यांना घडवलं.
नम्रता शिरोडकर हिनेही आपल्या दोन मुलांसोबतचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण, महेश बाबू सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्यामुळे तो गणपती उत्सवात कुटुंबासोबत सामील होऊ शकला नाही. नम्रताने पोस्टमध्ये लिहिले आहे की, "बाप्पा घरी आले आहेत आणि आम्ही सर्व खूप आनंदी आहोत. तुम्हा सर्वांना प्रेम, शांती आणि समृद्धी लाभो. मी तुम्हाला खूप मिस करत आहे, महेश. सर्वांना शुभेच्छा".
या फोटोंमध्ये नम्रता शिरोडकर पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तिची मुलगी सितारा दक्षिण भारतीय पारंपरिक लूकमध्ये आहे, तर मुलगा गौतम ट्राउझर्स आणि टी-शर्टमध्ये दिसत आहे. हा कौटुंबिक फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. नम्रताची बहीण शिल्पा शिरोडकर हिनेही या फोटोवर 'गणपती बाप्पा मोरया' अशी कमेंट केली आहे.
महेश बाबूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'SSMB29' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एस.एस. राजमौली यांचा 'SSMB29' चित्रपट २७ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जातं आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांकडून अधिकृत घोषणाही झालेली नाही. या चित्रपटात महेशसोबत बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्राही दिसणार आहे. ही एक ग्लोबल अॅडव्हेंचर अॅक्शन फिल्म असणार आहे. एस.एस. राजमौली यांच्या 'बाहुबली' आणि 'RRR'सारख्या ब्लॉकबस्टरनंतरचा हा प्रोजेक्ट असल्याने, प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.