Join us

सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 08:11 IST

‘सिनेमा हे माझ्या हृदयाचे स्पंदन आहे’ या शब्दांत मोहनलाल यांनी पुरस्कार स्वीकारताना केलेल्या विनम्र भाषणात सिनेमा या कलेचा गौरव केला.

रेखा देशपांडे ज्येष्ठ पत्रकार

मराठी चित्रपट रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र असतात हिंदी चित्रपट-कलावंत व ‘सेलिब्रिटी’  म्हणवून घेण्यात धन्यता मानणारे मराठी कलावंत. म्हणून जेव्हा मोहनलाल यांच्यासारख्या बहुमुखी क्षमतेच्या कलावंताचा फाळके पुरस्काराने सन्मान होतो तेव्हा त्यांचे सिनेमा क्षेत्राला किती मोठे योगदान आहे आणि व्यक्ती म्हणून त्यांचे नेमके काय मोठेपण आहे, हे सांगणे आवश्यक ठरते. मल्याळम चित्रपटसृष्टीला हा दुसऱ्यांदा मिळालेला गौरव आहे. २००४ मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांना फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 

एफटीआयआयमधून प्रशिक्षण पूर्ण करून परत आल्यावर लगोलग चित्रपट करायची घाई न करता अदूर यांनी केरळमध्ये फिल्म सोसायटी चळवळ सुरू करून सुजाण प्रेक्षक घडवायला सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची परंपरा तर सुरू झालीच पण प्रेक्षकांनीही अदूर यांना भरभरून दाद दिली. मोहनलाल यांचा सिनेमा हा केरळच्या याच मुशीतून वाढला आहे. सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी मुख्यतः मल्याळम आणि तमिळ, तेलूगू, कन्नड तसेच हिंदी चित्रपटांतही सुमारे चारशे वैविध्यपूर्ण भूमिकांतून जाणकार समीक्षकांची आणि प्रेक्षकांचीही दाद मिळविली. खलनायक, नायक, अँटीहिरो, पार्श्वगायक, निर्माता, दिग्दर्शक, गंभीर तसेच विनोदी भूमिकांमध्ये लीलया छाप पाडणारा अभिनेता अशी त्यांची ख्याती आहे.

‘वानप्रस्थम्’ मधील अंतर्द्वंद्वग्रस्त कथकली नर्तक ते ‘दृश्यम’मधील कुटुंबाच्या संरक्षणासाठी सरसावलेला सामान्य माणूस ते ‘कंपनी’ या हिंदी चित्रपटातील पोलिस कमिशनर या भूमिका त्यांच्या अभिनय क्षमतेच्या आवाक्याची केवळ एक चुणूक. १९९९ मध्ये कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘अनसर्टन रिगार्ड’ या स्पर्धेत ‘वानप्रस्थम्’ ला विदेशांतील प्रेक्षकांचाही  मोठा प्रतिसाद लाभला. या भूमिकेला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले. आक्रस्ताळेपणा करीत उपदेशांचे डोस पाजणाऱ्या फिल्मी पोलिस कमिशनरांहून हटके, शांत, संयमी आत्मविश्वासाने कामगिरी फत्ते करणाऱ्या पोलिस कमिशनर श्रीनिवासन ही रामगोपाल वर्मांच्या ‘कंपनी’मधील मोहनलाल यांची भूमिका त्यांच्या विचारी व स्वाभाविक अभिनय-शैलीचा प्रत्यय आणून देते. मल्याळम् रंगभूमीही मोहनलाल यांनी गाजवली. कवलम् नारायण पणिक्कर यांच्या दिग्दर्शनात ‘कर्णभारम्’ या संस्कृत नाटकातली मोहनलाल यांची कर्णाची भूमिका हा आणखी एक देखणा आविष्कार. 

सिनेमा हे माझ्या हृदयाचे स्पंदन...

‘सिनेमा हे माझ्या हृदयाचे स्पंदन आहे’ या शब्दांत मोहनलाल यांनी पुरस्कार स्वीकारताना केलेल्या विनम्र भाषणात सिनेमा या कलेचा गौरव केला. ‘हा पुरस्कार आपल्याला मिळेल असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते, त्यामुळे स्वप्न साकार झाले असे मला म्हणता येणार नाही’ अशी स्पष्टोक्ती देखील त्यांनी केली. ‘हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून संपूर्ण मल्याळम सिनेमा क्षेत्राचा आहे’, या उद्गारातील त्यांचा सच्चेपणा प्रकर्षाने भावतो. 

५ राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषणचे मानकरी मोहनलाल यांच्या योगदानाची योग्य दखल घेतल्याबद्दल भारत सरकार अभिनंदनास पात्र आहे. हीच तत्परता मामुटी या आणखी एका ज्येष्ठ-श्रेष्ठ मल्याळम अभिनेत्याच्या बाबतीत दाखवली तर मल्याळम सिनेमाच्या योगदानाचा पूर्ण गौरव झाला असे म्हणता येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Mohanlal: From Kathakali to Common Man, A Masterclass in Acting

Web Summary : Mohanlal's multifaceted talent, recognized with the Phalke Award, stems from his diverse roles. From 'Vanaprastham's' Kathakali dancer to 'Drishyam's' common man, his performances showcase incredible range. His humility and dedication to Malayalam cinema shine through.
टॅग्स :दादासाहेब फाळके पुरस्कार