दाक्षिणात्य कलाकार अभिनेता धनुष (Dhanush)आणि अभिनेत्री नयनतारामध्ये (Nayantara) सध्या वाद सुरु आहेत. नयनताराने तिच्या डॉक्युमेंटरीसाठी धनुषकडून एका व्हिडिओसाठी एनओसी मागितली होती. मात्र धनुषने ती दिली नाही. यानंतर नयनताराने तिच्याकडेचा फक्त ३ सेकंदाचा व्हिडिओ वापरला. यावरुन धनुषने तो व्हिडिओ काढण्यासाठी अल्टिमेटम दिला. नयनताराने सर्व प्रकार सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामुळे त्यांचा वाद चव्हाट्यावर आला. या सर्व वादादरम्यानच नयनतारा आणि धनुष एकमेकांसमोर आले आहेत.
निर्माते आकाश भास्करनच्या लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या लग्नात धनुष उपस्थित होता. तर नंतर नयनताराही तिच्या नवऱ्यासोबत आली. धनुष आधीच हॉलमध्ये समोरच्या रांगेत बसला होता. नयनतारा आणि तिचा पती आल्यानंतर तेही समोरच्याच रांगेत मात्र दुसऱ्या बाजूला बसले होते. नयनतारा आणि धनुष दोघांमध्ये काहीच संवाद झाला नाही. दोघांनी एकमेकांकडे दुर्लक्ष केलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
धनुष आकाश भास्करनच्या आगामी 'इडली कढाही' सिनेमात दिसणार आहे. या लग्नात तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. धनुष पांढऱ्या पारंपरिक वेशात आला होता. तर नयनतारा गुलाबी साडीत सुंदर दिसत होती. सध्या धनुष आणि नयनताराचं प्रकरण कोर्टात सुरु आहे.