मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. आसामच्या प्रसिद्ध गायिका गायत्री हजारिका (gayatri hazarika) यांचे निधन झाले. काल (१६ मे) गायत्री यांनी अखेरचा श्वास घेतला. गुवाहाटीतील नेमकेअर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ४४ वर्षांच्या होत्या. गायत्री गेले काही वर्ष कॅन्सरशी लढा देत होत्या. परंतु त्यांची ही झुंज अपयशी ठरली. गायत्री यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
गायत्री यांची कारकीर्द
गायत्री हजारिका यांनी त्यांच्या भावपूर्ण आवाजाने आसामच्यासंगीतविश्वात आपली खास ओळख निर्माण केली होती. त्यांचे "झोरा पाटे पाटे फागुन नामे" हे गाणे अत्यंत लोकप्रिय ठरले होते. त्यांच्या निधनाने आसामच्या संगीतसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
गायत्री यांच्या गाजलेल्या गाण्यांमध्ये 'रती रती', 'थिकोना', 'कुवाना', 'जोनक नसील बनोत', 'तुमी कोन बिरोही अनन्या', 'जेटिया जोनक नमिसील' यांचा समावेश आहे. गायत्री यांच्या पार्थिवावर नवग्रह स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गायत्री यांच्या निधनामुळे आसामी संगीतविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. गायत्री या अनेक नवोदित गायकांसाठी प्रेरणास्रोत होत्या. आसामी गाण्याला आणि संगीताला जागतिक पातळीवर घेऊन जाण्यामध्ये गायत्री यांचाही मोठा वाटा होता.