मनोरंजन विश्वातून धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. अभिनेत्री मंजुला श्रुतीवर तिच्या पतीने गंभीर हल्ला केला आहे. ही घटना १२ जुलै २०२५ रोजी बेंगळुरू शहरातील हनुमंतनगर भागात घडली. मंजुुला घरी एकटीच होती, तेव्हा तिच्या पती अमरेशने घरात घुसून तिच्यावर आधी पेपर स्प्रे मारला आणि नंतर चाकूने तिच्या अंगावर अनेक वार केले. तिच्या छातीत, मानेवर आणि पायांवर यामुळे गंभीर जखमा झाल्या आहेत. इतकंच नाही तर त्याने तिचं डोकं भिंतीवर आपटलं, ज्यामुळे ती कोसळली.
अभिनेत्रीवर हल्ला झाल्याने सर्वांना धक्का
या गंभीर घटनेवेळी त्यांची दोन मुलं कॉलेजला गेलेली होती. शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकून पोलिसांना बोलावलं आणि अमरेशला पकडण्यात आलं. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंजुला आणि अमरेश यांचं लग्न २० वर्षांपूर्वी झालं होतं. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्यात वाद सुरू होते. काही महिन्यांपूर्वी मंजुला आपल्या भावाकडे राहायला गेली होती. परंतु दोघांनी सामंजस्याने हे वाद सोडवले. त्यामुळे मंजुला पुन्हा पतीसोबत राहायला आली होती. परंतु त्यांच्यातील वाद मिटले नाहीत आणि या वादाने गंभीर रुप धारण केलं.
पण काल (शुक्रवारी) मंजुलावर वार झाल्याने तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती सध्या स्थिर असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अनेक कलाकार आणि चाहते ती लवकर बरे व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत. मंजुला आणि श्रुती यांचा प्रेमविवाह होता. दोघांच्या लग्नाला २० वर्ष पूर्ण झाली होती. तरीही त्यांच्यात अनेक वाद सुरु होते. सध्या मंजुलाच्या पतीला पोलिसांनी अटक केली असून पुढील सुनवाईसाठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.