दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरिट' या बहुचर्चित चित्रपटातून दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांनी एक्झिट घेतल्याच्या बातम्यांनी गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. दिग्दर्शकाशी झालेल्या वादानंतर प्रकाश राज यांनी चित्रपट सोडल्याचा दावा केला जात होता. मात्र, आता स्वतः प्रकाश राज यांनी या सर्व बातम्या फेटाळून लावत त्या निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले प्रकाश राज?
प्रकाश राज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (ट्विटर) वर यासंदर्भात पोस्ट करत आपला राग व्यक्त केला आहे. त्यांनी या बातम्यांना निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. प्रकाश यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "विषारी आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकांसाठी... 'स्पिरिट' चित्रपटाबद्दल सांगायचे तर, माझ्या भागाचे शूटिंग अद्याप सुरूही झालेले नाही आणि तुम्ही 'व्हॉट्सॲप फॅक्टऱ्यां'मधून मनाला येईल त्या बातम्या रचत आहात. अरे जरा पुढे जा आणि स्वतःचे आयुष्य जगा."
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, हैदराबादमधील शूटिंग दरम्यान संदीप रेड्डी वांगा आणि प्रकाश राज यांच्यात एका सीनवरून कडाक्याचे भांडण झाले आणि प्रकाश राज यांनी तडकाफडकी सेट सोडला. मात्र, प्रकाश राज यांच्या स्पष्टीकरणानंतर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. ते या चित्रपटात प्रभास, तृप्ती डिमरी आणि विवेक ओबेरॉय यांच्यासोबत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
याआधी अभिनेत्री दीपिका पादुकोणने वैयक्तिक कारणांमुळे आणि मानधनाच्या मुद्द्यावरून या चित्रपटातून माघार घेतली होती. मात्र, प्रकाश राज यांच्या बाबतीत पसरलेली बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचे सिद्ध झाले आहे. संदीप रेड्डी वांगा यांनीही या अफवांवर नाराजी व्यक्त केली आहे. 'स्पिरिट' हा चित्रपट भद्रकाली पिक्चर्स आणि टी-सीरीज द्वारे निर्मित असून प्रभास यात एका दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे.
Web Summary : Actor Prakash Raj refuted rumors of exiting Sandeep Reddy Vanga's 'Spirit' due to a dispute. He clarified that shooting hadn't even begun and condemned the spread of false news. Raj remains part of the cast alongside Prabhas.
Web Summary : अभिनेता प्रकाश राज ने संदीप रेड्डी वांगा की 'स्पिरिट' फिल्म को विवाद के कारण छोड़ने की अफवाहों का खंडन किया। उन्होंने स्पष्ट किया कि शूटिंग शुरू भी नहीं हुई थी और झूठी खबरों के प्रसार की निंदा की। राज प्रभास के साथ कलाकारों का हिस्सा बने हुए हैं।