रजनीकांत यांचा 'कुली' चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रजनीकांत यांची जादू मोठ्या पडद्यावर चांगलीच चालली आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह नागार्जुन अक्किनेनी, आमिर खान, श्रुती हासन, असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत. लोकेश कनकराज दिग्दर्शित 'कुली' चित्रपटात आमिर खानने १५ मिनिटांच्या भूमिकेसाठी तब्बल २० कोटी रुपये घेतले असल्याची चर्चा आहे. यावर आता खुद्द आमिरने खुलासा केलाय.
आमिर खानने कॅमिओसाठी खरोखरच इतकी मोठी रक्कम घेतलेली नाहीये. डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, आमिर खानने खुलासा केला की त्याने 'कुली' चित्रपट मोफत केला आहे. आमिरनं 'कुली' साठी एकही रुपया घेतलेला नाही. आमिर खान म्हणाला, "रजनीकांतसोबत स्क्रीन शेअर करणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे आणि माझ्यासाठी हा एक मोठे बक्षीस आहे. मी फक्त एखा पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. रजनीकांत आणि नागार्जुन हे चित्रपटाचे खरे नायक आहेत. लोक फक्त त्यांना पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत आणि त्यांना पसंत करत आहेत".
'कुली' हा चित्रपट दररोज बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडत आहे. अवघ्या तीन दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'कुली' हा सर्वात जलद ३०० कोटींचा टप्पा गाठणारा तमिळ चित्रपट बनला आहे. त्याने थलापती विजयच्या 'लिओ'ला मागे टाकले आहे. 'लिओ' ने हा टप्पा ४ दिवसांत गाठला होता.