71st National Film Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज(मंगळवार २३ सप्टेंबर) दिल्लीत ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. दाक्षिणात्य अभिनेता मोहनलाल यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून त्यांनी सिनेसृष्टीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच याची घोषणा केली होती.
मोहनलाल यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार स्विकारला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. "हा सर्वोच्च पुरस्कार दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. हा पुरस्कार फक्त माझा नाही तर संपूर्ण मल्याळम सिनेसृष्टीचा आहे. या पुरस्काराची घोषणा झाली तेव्हा मी खूपच आनंदित होतो. केवळ हा पुरस्कार मिळाला म्हणून नाही तर सिनेमाची परंपरा पुढे घेऊन जायची आहे म्हणून. मी कधीच या क्षणाचा विचार केला नव्हता. मी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. त्यामुळे हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे नाही तर अद्भुत क्षण आहेत. या पुरस्कारामुळे सिनेमाप्रती माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. सिनेमा माझ्या हृदयात आहे", अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
मोहनलाल यांचा चित्रपट प्रवास लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आतापर्यंत त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे . त्यांनी केवळ मल्याळमच नाही तर तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. मोहनलाल यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि नऊ केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मश्रीसारखे सन्मान देखील दिले आहेत.