Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बेगर अ‍ॅक्ट’मध्येही सोनूने केली मोहम्मद रफींची कॉपी

By admin | Updated: May 25, 2016 03:21 IST

सध्या सोशल मीडियावर सोनू निगमचा ‘बेगर अ‍ॅक्ट’ खूप गाजतोय. मेकअप करून संपूर्णपणे भिकाऱ्याच्या वेशात त्याने हार्मोनियमसह फुटपाथवर गाणे गायिले.

सध्या सोशल मीडियावर सोनू निगमचा ‘बेगर अ‍ॅक्ट’ खूप गाजतोय. मेकअप करून संपूर्णपणे भिकाऱ्याच्या वेशात त्याने हार्मोनियमसह फुटपाथवर गाणे गायिले. घड्याळाच्या काट्यावर आयुष्य जगणाऱ्या मुंबईकरांनी सोनूला ओळखले नाही. परंतु त्याचा सुमधुर आवाज ऐकून काही लोक त्याच्यापाशी थांबले, त्याची चौकशी केली. एकाने मोबाइलमध्ये त्याचे गाणे रेकॉर्ड केले. पण कोणालाच याचा थांगपत्ता लागला नाही की, तो प्रख्यात गायक सोनू निगम आहे.सोनू म्हणतोय की, लोकांनी त्याच्या गायिकीला दिलेले पैसे त्याच्यासाठी लक्षावधीच्या मानधनापेक्षा कमी नाहीत. (त्याला मिळालेले १२ रुपये सोनूने फ्रेम करून लावले आहेत.) आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये आपण केवळ पुढे धावत असतो. मात्र दोन क्षण थांबून आजचा आनंद घेण्याचा संदेश देण्यासाठी त्याने हा सगळा खटाटोप केला.आता हे सारे त्याने जरी चांगल्या हेतूने केले असले तरी त्याने हे करताना दुसऱ्या एका गायकाची कॉपी केली आहे. तो गायक दुसरातिसरा कोणी नसून महान गायक मोहम्मद रफी आहेत.सोनू निगमचा ‘बेगर्स अ‍ॅक्ट’ पाहून आम्हाला ज्येष्ठ चित्रपट समीक्षक इसाक मुजावर यांनी एका वाहिनीवर फार वर्षांपूर्वी शेअर केलेला किस्सा आठवला. त्याचे झाले असे की, एकदा रफीसाहेब रस्त्यावरून पायी जात असताना एका भिकाऱ्यावर त्यांची नजर पडली. तो गरीब बिचारा जीव ओतून गात होता; परंतु लोक आपल्या तंद्रीत पुढे निघून जात होते. हे पाहून रफी त्याच्या शेजारी बसले व गाणं गाऊ लागले. त्या काळात आजच्यासारखा टीव्हीचा प्रसार नसल्यामुळे लोकांनी रफींना ओळखले नाही. त्यांच्या आवाजाने पायी चालणाऱ्यांना थबकण्यास भाग पाडले. आवाजाची जादू अशी की, लोक एक एक करत पुढ्यात पैसे टाकू लागले. हे पाहून तर भिकाऱ्याला विश्वासच बसेना. हा माणूस कोण आहे आणि तो गाऊ लागल्यावर सगळे लोक पटापट पैसे कसे काय देताहेत याचं कोडं त्याला काही सुटेना. थोड्याच वेळात समोरच्या फाटक्या कपड्यावर चारशे रुपये जमा झाले (विचार करा त्या काळातील हे चारशे रुपये!). मग एकही शब्द न बोलता जाता जाता रफीसाहेबांनी अंगावरची शाल त्या भिकाऱ्याला देऊन निघून गेले. सोनू निगमचे अख्खे करिअर मोहम्मद रफींच्या गाण्यांनी प्रेरित झालेले आहे हे तर सर्वांनाचा माहीत आहे. रफींच्या आवाजाची, त्यांच्या गाण्यांची सोनूवर असलेली छाप आणि प्रभाव हा तर स्पष्टच दिसून येतो. त्यामुळे गाण्यांबरोबरच रफींच्या ‘बेगर्स अ‍ॅक्ट’चीही कॉपी करण्याचा त्याला मोह झाला असेल तर आपण समजू शकतो, नाही का?रफींच्या आॅडीमध्ये भिकारीरफींचा असाच आणखी एक किस्सा सोनू पुढच्या वेळी कॉपी करू शकतो. मुंबईतील वांद्रा मशीदमधून बाहेर पडताना पायऱ्यांवर बसलेल्या एका भिकाऱ्याने त्यांना ‘दिल में छुपा के प्यार का तुफान’ हे गाणे गाण्याची विनंती केली. त्यावर रफी त्याला म्हणाले, ‘हे पवित्र स्थळ आहे. येथे मी नाही गाऊ शकत. तू माझ्यासोबत चल.’ मशीदपासून काही अंतरावर उभ्या केलेल्या त्यांच्या इम्पोर्टेड आॅडी गाडीत त्या भिकाऱ्याला बसवले. एवढ्या आलिशान गाडीत प्रथमच बसलेला तो भिकारी गांगरून गेला. त्याला आश्वस्त केल्यावर रफींनी त्याच्या गाण्याची फर्माईश पूर्ण केली. दिलीप कुमारसाठी गायलेले गाणे त्या भिकाऱ्यासाठी गायल्यानंतर रफींनी त्याला शंभर रुपयेही दिले. त्या वेळी त्यांचे मित्र आणि लेखक एहतेशाम अली रफींबरोबर होते. त्यांनीच ही आठवण एका उर्दू मासिकात लिहिलेली आहे.

विदेशातही ‘बेगर्स अ‍ॅक्ट’चा प्रयोगजगातील सर्वोत्तम संगीतकारांपैकी एक जोशुआ बेल यांनीदेखील २००७ साली वॉशिंग्टन डीसी शहरातील मेट्रो स्टेशनवर साध्या वेशात व्हायोलिन वादन केले होते. सुमारे ४५ मिनिटे त्यांनी व्हायोलिनच्या सर्वोत्कृष्ट रचनांचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे, ते वाजवत असलेल्या व्हायोलिनची किंमतच ३.५ मिलियन डॉलर्स (२३.५ कोटी रु.) होती. स्टेशनवरच्या गर्दीमध्ये कोणीच त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.

रिचर्ड गेर‘टाइम आउट आॅफ मार्इंड’ चित्रपटात रिचर्ड गेर (तोच तो शिल्पा शेट्टीला किस करणारा!) मानसिक संतुलन बिघडलेल्या एका बेघर व्यक्तीच्या भूमिकेत होता. एका महत्त्वाच्या सीनसाठी तो शहराच्या गर्दीतून फिरण्याचे शूटिंग करायची होती. बेघर व्यक्तीच्या वेशातील रिचर्ड गर्दीतून फिरला आणि त्याला कोणीच ओळखले नाही. वेडा म्हणून लोकांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि शूटिंग पार पडले.

- mayur.deokar@lokmat.com